शेतकरी संकटात : पवनी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी पवनी : तालुक्यात भात शेतीवर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अवलंबून आहे. जुलै ते आॅक्टोबर दरम्यान अपुरा पाऊस झाल्याने भातशेती अडचणीत सापडलेली होती. त्यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी नदी, नाले, तलाव व गोसेखुर्दचे कालवे यामधून पाणी लिफ्ट करून शेतीला दिले. परंतु आॅक्टोबरच्या सुरुवातीपासून भातशेतीवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला व हातात येणारे थोडेफार पिक सुद्धा नष्ट झाले.भातपिकाला शेवटपर्यंत पाणी मिळाले तर भातपिकानंतर त्याच जमिनीमध्ये रब्बीचेपिक घेण्यात येते. गहू, हरभरा, चना, डाळवर्गीय पिकासाठी जमीन ओली असते. परंतु अपुऱ्या पावसामुळे व आॅक्टोबर महिन्यात पाऊस न पडल्याने शेतजमीन पूर्णत: वाळलेली आहे. त्यामुळे रब्बीचे पिकसुद्धाघेता येत नाही. खरीप व रब्बी दोन्ही पिक घेवू न शकणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर होणार आहे. तरी देखील तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेली नाही.अपुरा पाऊस व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांनी भातपिक वाचविण्यासाठी कर्जबाजारी होऊन इंजीनद्वारे पाणी व रासायनिक खते व कीटकनाशक फवारणी यासाठी मोठी रक्कम खर्च केली. परंतु पिक झाले नाही. परिणामी कर्जाची परतफेड करणे व कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणे हे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे आहे. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांची व्यथा शासनदरबारी मांडावी अशी त्यांची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
निसर्गाची अवकृपा; भातशेती धोक्यात
By admin | Updated: October 27, 2015 00:45 IST