प्रकरण भोवणार : तुमसर पालिकेचा प्रताप मोहन भोयर तुमसारशालेय ते महाविद्यालयीन शिक्षणात प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिनी राष्ट्रीय ध्वजाविषयी माहिती देण्यात येते. तिरंगा ध्वजातील रंग व त्यांचा क्रम ठरलेला आहे. परंतु तुमसर नगर परिषदेने प्रजासत्ताक दिनाच्या निमंत्रण पत्रिकेत तिरंगा ध्वज चक्क उलटा फडकविला असून या ध्वजात दोनच रंग दिसून येत आहे. निमंत्रण पत्रिकेवर नगराध्यक्षासह २४ नगरसेवकांची नावे असून विनिंत म्हणून मुख्याधिकाऱ्यांचे नाव आहे. निमंत्रण पत्रिकेवरील या चुकीबाबत तुमसरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे नियंत्रण तुमसर नगरपरिषदेने शहरातील अधिकारी, गणमान्य नागरिकांना दिले आहे. निमंत्रण पत्रिका देखणी असून तुमसर नगरपरिषदेचा प्रवेशद्वार पत्रिकेत आहे. प्रवेशद्वाराच्या वर राष्ट्रीय ध्वज तिरंगा लावण्यात आला आहे. यात पांढरा रंग सर्वात खाली असून त्यावर हिरवा रंग आहे. तर केशरी रंग गायब आहे. बाजूलाच तुमसर नगर परिषदेचा ‘क्लीन अँड ग्रीन’ चा लोगो आहे.निमंत्रण पत्रिकेवर नगराध्यक्षासहीत, उपाध्यक्ष तथा २३ नगरपरिषद सदस्यांची नावे पदासहीत लिहिली आहेत. विशेष अतिथी प्रमुख अतिथी तथा प्रमुख उपस्थितांचा क्रम लावण्यात आला आहे. विनित मध्ये मुख्याधिकारी व सर्व कर्मचारीवृंद असे नमूद आहे. मुख्याधिकाऱ्यांचे नाव पत्रिकेत नाही केवळ हुद्दा लिहिला आहे.निमंत्रण पत्रिका तयार करताना तथा मुद्रीत झाल्यावर नावे व सर्वात महत्वाचे म्हणजे तिरंग्याकडे लक्ष कसे गेले नाही हा प्रमुख प्रश्न आहे. मुख्याधिकारी तथा इतर कर्मचाऱ्यांनी मुद्रीत निमंत्रण पत्रिका तपासली नाही काय? एवढी मोठी चुक कशी घडली. तिरंग्याचे नियम अतिशय कडक असून ते काटेकोरपणे पाळले जावे असे निर्देश प्रशासनाकडून प्राप्त होतात. या चुकीबद्दल प्रशासन संबंधितांवर कोणता जाब विचारते व कारवाई करते हे कळेल. सध्या या निमंत्रण पत्रिकेची शहरात चर्चा सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)पत्रिकांची छपाई करणाऱ्या व्यक्तीकडून अनवधानाने तांत्रिक चूक झाली. वितरित करण्यात आलेल्या पत्रिका नागरिकांकडून परत घेवून त्यांची जाहिर माफी मागितली आहे.- चंद्रशेखर गुल्हाणे,मुख्याधिकारी, न.प. तुमसर
निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रध्वज उलटा
By admin | Updated: January 24, 2016 00:37 IST