श्रोते मंत्रमुग्ध : साकोलीत मराठी बोलीवर कवी संमेलन शिवशंकर बावनकुळे ल्ल साकोली‘मसनात चिता दुसऱ्याची आहे हे कळत आहे. मज वाटे त्या सरणावर शव माझे जळते आहे.’ या हृदयस्पर्शी कवितेतून प्रल्हाद सोनवाने यांनी शेतकऱ्यांचे दु:ख मांडले. सध्याची दयनिय परिस्थिती मांडताना दिनेश पंचबुध्दे म्हणतात,‘जाती-धर्मवादाच्या भट्टया आज मस्त पेटत आहेत. सज्जनांच्या घरांना हे बिनदिक्कत लुटत आहेत.’मराठी बोली साहित्य संघ नागपूर झाडीबोली साहित्य मंडळ साकोली, सर्वसमावेशक लोककला संघ भंडारा यांच्या विद्यमाने मंगळवारला मराठी बोली साहित्य संघाच्या वर्धापन दिनानिमित्त नंदलाल पाटील कापगते विद्यालयात कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. हरिशचंद्र बोरकर होते. उद्घाटक म्हणून अशोक गुप्ता होते. प्रा.विलास हलमारे यांच्या बहारदार संचालनाने काव्य मैफिलीची रंगत वाढली. ‘जय बोला जय माय झाडी’ या झाडीगौरव गीताने लोकराम शेंडे यांनी कविसंमेलनाची सुरुवात केली. सामाजिक विद्रोहाने मराठी बोली, शाहिरी, झाडीबोलीतील दमदार कवितांची अभिव्यक्ती या काव्य मैफिलीचे वैशिष्टय होते. या काव्य मैफलीत ७६ वर्षांचे दौलत पठाण यांना पे्रमावर कविता सादर करुन मन तरुण असल्याची जाणीव करुन दिली. दुधराम संग्रामे यांनी भजन गायले. गुलाब पठाण यांनी लोककलेवर, गोपींचद नागोशे यांनी कुटूंब नियोजनावर कविता सादर केली. स्वच्छतेचे जीवनातील महत्त्व यावर मारुती धनजोडे यांनी वास्तव मांडले. शहीदविरांच्या आठवणी सुशिला लांजेवार यांनी मांडल्या. आयुष्याचा जमाखर्च विजय मेश्राम यांनी मांडला. धनराज ओक यांनी स्वांतत्र्याची आठवण करुन दिली. वडीलांनी कसे घडविले याचे चित्रण घनश्याम लंजे यांनी केले. सुखदेव झोडे, दिवाकर मोरस्कर, राम महाजन, डोमा कापगते, ज्ञानेश्वर नेवारे, सदानंद लांजेवार, पालीकचंद बिसने यांनीही कविता सादर केल्या. डॉ.हेमकृष्ण कापगते यांनी भरोशाचा पाऊस, नको तू लवकर जाऊस, असे पावसाचे वर्णन केले. मराठी आमची बोली, महाराष्ट्राची माऊली, अंजनाबाई खुणे आम्ही सर्वाची सावली, अशी निमंत्रण पत्रिकेवर विनोद भोवते यांनी कविता सादर केली. देवीदास इंदापवार गजल गाताना म्हणतात,‘तुझा ध्यास होता तुझी बात होती, तुझी प्रीत तेव्हा वसंतात होती, तुझी भेट झाली ग स्वप्नात माझ्या, इथे सोबतीला खुळी जात होती.‘बहिनाबाई’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या अंजनाबाई खुणे म्हणाल्या, ‘मोठा झाडा होऊन तो, सावली देवाचा होता, माणसाच्या कुऱ्हाडीने फासली त्याची होते. हिरामण लांजे म्हणाले, गर्व नस जातीचा, ना नस धर्माचा, गर्व आहे देशाचा, अन देशातल्या सर्वांचा, कोणत्याही जाती धर्माचा असो आपण एक आहोत आणि सर्वांचे रक्त एक आहे याचे वास्तव मांडले. झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. हरिशचंद्र बोरकर यांनी झाडीबोली मराठी बोलीसंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. हरिश्चंद्र बोरकर लिखित ‘मवजा रेंगेपार कोहरी’ आणि डोमा कापगते लिखित ‘निरंकारी भजनगंगा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक सुबोध कानेकर यांनी केले.
मज वाटे त्या सरणावर शव माझे...
By admin | Updated: August 22, 2015 00:54 IST