कारेमोरे यांनी दिले प्रशिक्षण : लाखनी येथील नगरपंचायतीचा उपक्रमतुमसर : लाखनी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाले. निधीही ग्रामपंचायतच्या तुलनेने भरपूर मिळाली. मात्र त्या निधीची विल्हेवाट कशी लावावी, नगरसेवकांचे कर्तव्य व अधिकारापासून अनभिज्ञ असलेल्या नगरा यक्षा तसेच नगरसेवकांची तुमसरचे नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी कार्यशाळा घेतली.यावेळी सदस्यांनी सुशासन चालविण्याचे धडे गिरविले. जिल्ह्यातील अनेक मोठ्या ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाले व ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येणारा हा नगरसेवक बनला खरा. मात्र त्यांना त्यांचे अधिकार व कर्तव्य काय? हे माहितच नाहीत हे वास्तव्य आहे. त्याही उपर ग्रामपंचायतला मिळणारा निधी व नगरपंचायतला विविध योजनेअंतर्गत मिळणारा भरपूर निधीची विल्हेवाट कशी लावावी तसेच नगरपंचायतचे प्रस्ताव कुणाकडे सादर करावे आदी सर्व बाबींपासून नगरपंचायतचे नगरसेवकासह नगराध्यक्षही अनभिज्ञ आहेत. परिणामी नगरपंचायतला शासनाकडून मिळालेला निधी खर्च झाला नाही व नगरात कोणतेही कामे झाले नसल्याचे चित्र आहे. यामुळे व्यथीत झालेल्या लाखनी येथील नगराध्यक्षा कल्पना भिवगडे यांनी तुमसरचे नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांना पत्र पाठवून नगरसेवकांची कार्यशाळा घेण्याबाबत विनंती केली. खरे तर शासनानेच नगरपंचायतच्या नगरसेवकांना कार्यशाळा घेणे येथे गरजेचे होते. परंतु शासनाने अजूनपर्यंत नगरनिर्वाचित नगरसेवकांची कार्यशाळा घेण्याचे सौजन्य दाखविले नसल्याने अनुभवी नगराध्यक्षांना विनंती करून लाखनी नगरपंचायतमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेत नगराध्यक्ष कारेमोरे यांनी विविध योजनेची विस्तृत माहिती देवून कोणत्या पद्धतीने प्रस्ताव कुठे सादर करावे याची प्रशासकीय मान्यता कशी घ्यावी? कामाचे नियोजन कसे करावे? शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरिता कोणकोणते प्रयत्न करावे आदी समजावून सांगितले. लाखनीच्या नगरसेवकात नवचैतन्य निर्माण होवून ते जोमाने कामाला लागले. यावेळी कार्यशाळेत नगराध्यक्ष कल्पना भिवगडे, उपाध्यक्ष धनू व्यास, सभापती धनंजय तिरपुडेसह सर्व नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधीे)
नगराध्यक्षांनी घेतली नगराध्यक्ष, नगरसेवकांची कार्यशाळा
By admin | Updated: May 16, 2016 00:33 IST