भंडारा : १५ जुलैपासून राज्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असले तरी पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे. पाल्य शाळेत जात असताना आईची काळजी वाढली असून, काळजावर दगड ठेवून मुलांना शाळेत पाठवीत असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनामुळे गत सहा महिन्यांपासून शाळा बंद होत्या. दिवाळीनंतर शाळा उघडल्या तरी त्या अल्पावधीसाठीच राहिल्या. दुसऱ्या लाटेत शाळा पूर्णतः बंद होत्या. मात्र, आता राज्य शासनाच्या निर्देशानुसार आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाकाळात पाळले जाणारे नियम इमानेइतबारे पाळली जात असल्याचे पालकांनी सांगितले.
बॉक्स
शाळेतून घरी येताच कपडे बदला, आंघोळ करा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले. अशा स्थितीत पाल्यांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पाल्य शाळेतून घरी येताच पूर्ण कपडे बदलायचे, स्वच्छता ठेवायची किंबहुना आंघोळ करावी, असा उपक्रम सुरू झाला आहे. विशेष म्हणजे काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून पालकही हा सर्व खटाटोप करीत आहे. याशिवाय वर्गात असताना कधीही मास्क काढू नये तोंडाला वारंवार हाताचा स्पर्श होऊ नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, घरी आल्यावर कपडे धुवायला टाकावेत आणि आंघोळ करावी, असे नियमही पाळले जात आहेत.
बॉक्स
काळजी आहे; पण शिक्षणही महत्त्वाचे आहे
गुरुवारपासून शाळा सुरू झाली. माझा मुलगा नवव्या वर्गात आहे. पुढील वर्षी दहावीत जाईल. कोरोना संकट असले तरी मुलाचे शिक्षणही तेवढेच महत्त्वाचे आहे. आधीच गत दीड वर्षापासून अभ्यास तेवढ्या गांभीर्याने झाला नाही.
ललिता कोरे
माझी मुलगी इयत्ता आठवीत आहे. ती गुरुवारपासून नियमितपणे शाळेत जात आहे; परंतु ती शाळेत जात असताना तिच्या बॅगेत सॅनिटायझर, अतरिक्त मास्क आहे किंवा नाही याची काळजी घेत असते. याशिवाय सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असेही मी तिला सांगितले आहे.
मनीषा लांजेवार
शासनाने अटी व नियमांच्या आधारावर शाळा सुरू केल्या. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतीत लक्ष देणे गरजेचे आहे. शिक्षण महत्त्वाचे असले तरी आरोग्य आणि तेवढेच महत्त्वाचे आहे, वरून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
- सरिता कोल्हे