भंडारा : बारावी म्हणजे आयुष्याचा ‘टर्निंग पाईंट’ त्यामुळे वर्षभराच्या कठीण परिश्रमानंतर निकालाबाबतची उत्सुकता कोणाला असणार नाही? परंतु ऑनलाईन निकाल प्रक्रियेत एका क्लिकआड दडलेले यशापयश जाणून घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला आईच्या नावाचा पासवर्ड वापरावा लागला. निकाल जाणून घेताना संगणकीकृत पद्धतीच्या वापरामुळे होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाने लढविलेली ही क्लूप्ती बर्याच अंशी यशस्वी ठरली. इतकेच नव्हे तर यामुळे यशप्राप्तीतही मुलांना आईचे विस्मरण झाले नाही आणि अपयशामुळेच खचलेल्या आईच्या नावामुळे अप्रत्यक्ष बळही मिळाले. नुकतेच बारावीचे ऑनलाईन निकाल जाहीर झाले. संगणकावर केंद्र क्रमांक आणि रोल नंबर टाकून कुणालाही कुणाचा निकाल आतापर्यंत पाहता येत होता. त्यामुळे या पद्धतीचा गैरवापर सर्रास होत असल्याचे शिक्षण मंडळाच्या लक्षात आले होते. ही पद्धत गैरसोईची आणि पुरेशी पारदर्शक नसल्याचे स्पष्ट झाल्याने या पद्धतीमध्ये बदल करण्याचा विचार शिक्षण मंडळाने केला. त्यानुसार यंदाच्या वर्षापासून ऑनलाईन निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांला पासवर्ड म्हणून स्वत:च्या आईचे नाव टाकणे बंधनकारक करण्यात आले. आईचे नाव संगणकाने ग्राह्य धरल्यानंतरच विद्यार्थ्यांना निकाल बघण्यास मिळाला. या नव्या उपक्रमामुळे निकाल बघताना होणार्या गैरव्यवहारांना तर आळा बसलाच पण मुलांनाही आईच्या नावाचे महत्व कळणार आहे. विद्यार्थ्यांंच्या जीवनात बारावी परीक्षेचे असलेले महत्व लक्षात घेता यशाच्या पायरीवर चढताना विद्यार्थ्यांना आपल्या आईची कायम आठवण राहावी, ही अल्पकता शिक्षण मंडळाने यानिमित्ताने दाखविली आहे. शिक्षण मंडळातर्फे वेबसाईटवर निकाल पाहताना प्रत्येक विद्यार्थ्यांंला आईच्या नावाच्या पासवर्डचा वापर करून यशापयशापर्यंंत पोहचता आले.या पद्धतीचा वापर करण्यासाठी शिक्षण मंडळाने निकालासाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाईटमध्ये नव्या सॉफ्टवेअरचा वापर केला. शिक्षण मंडळाचा हा प्रयोग बर्याच अंशी यशस्वी ठरला. शिक्षण मंडळाने आईच्या नावाचा अशा कल्पक पद्धतीने वापर करून विद्यार्थ्यांंला आईची आठवण पासवर्डच्या रुपाने अनिवार्य करून एक आदर्श प्रस्तूत केला. (नगर प्रतिनिधी)
निकालाच्या क्लिकसाठी ‘आई’ ठरली पासवर्ड
By admin | Updated: June 9, 2014 23:28 IST