भंडारा : घराबाहेर पडले की लोकांना पाकीटबंद पाण्याच्या बाटलीशिवाय पर्याय नसतो. पूर्वी पाण्याची सोय म्हणून सोबत वॉटर बॅग नेली जायची. परंतु, आता प्रत्येकांना पाकीटबंद पाण्याची बाटली हवी असते. लोकांची मागणी लक्षात घेऊन अनेक बड्या कंपन्यांनी या बाटल्यांचे उत्पादन सुरू केले आहे. यातून रोज लाखो रुपयांचा व्यवसाय होत असतो.याची वार्षिक उलाढाल कोट्यवधीच्या घरात आहे. निव्वळ पाण्याचा पैसा असल्यामुळे मोठमोठय़ा हॉटेल्सपासून तर गल्लोगल्लीमध्ये या बाटल्या विकल्या जात आहेत. तथापि, मिनरल वॉटरच्या नावाखाली अनेक कंपन्यांनी आपली उत्पादने बाजारात आणली. परंतु, त्यात मिनरल किती हा संशोधनाचा विषय आहे. मिनरलच्या नावाखाली अनेक कंपन्या लोकांची दिशाभूल करीत आहेत. आजपासून अंदाजे १२ वर्षाअगोदर बिसलेरी या आंतरराष्ट्रीय कंपनीने पाण्याची पाकिटबंद बाटली बाजारात आणली. त्यात मिनरल समाविष्ठ करण्यात आले. सुरूवातीला याकडे लोकांनी दुर्लक्ष केले. परंतु, थोड्याच कालावधीत याच बिसलरीने अख्ख्या देशावर अधिराज्य निर्माण केले. अगदी गावापासून तर महानगरापर्यंत या बॉटल्स सहजतेने उपलब्ध होऊ लागल्या. लोकांनीही याला भरभरून प्रतिसाद दिला. या पाण्याच्या बाटलीच्या आहारी मध्यमवर्गिय व उच्च मध्यमवर्गिय मोठय़ा प्रमाणात गेले आहेत. हा प्रतिसाद पाहून अन्य कंपन्यांनीही आपली उत्पादने बाजारात आणली. आज लोकांना पाकीटबंद पाण्याच्या बाटलीशिवाय पर्याय नाही, ही स्थिती आहे. नामांकित कंपन्यांच्यासोबतीला काही बनावट कंपन्यांनीही आपली उत्पादने बाजारात आणली आहेत. लहानमोठय़ा सर्वच दुकानांमध्ये या बॉटल पोहोचली. परंतु, अद्याप त्यांच्यावर निर्बंध घालण्यात आले नाही.(शहर प्रतिनिधी)
‘मिनरल वॉटर’चा व्यवसाय फोफावला
By admin | Updated: June 4, 2014 23:30 IST