ढिवरवाडा मार्गावरील घटना
करडी (पालोरा) :
भरधाव जाणार्या दूध वाहून नेणार्या मेटॅडोरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली. मृतक हे नात्यात सासरे, जावई लागतात. ही घटना बुधवारी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास भिलेवाडा ते पालोरा (करडी) मार्गावरील ढिवरवाडा जंगलातील वळणावर घडली. सतीश जगन मारबते (२५) रा. गराडा/बासोरा आणि गळीराम महादेव मेश्राम (५०) रा. खमारी/बु. अशी मृतांची नावे आहेत. गळीराम मेश्राम यांची पत्नी निशा (४०) ही गंभीर जखमी असून तिच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे तिघेही खमारी बु. येथून तुमसर तालुक्यातील मांढळ/सुकळी येथे दुचाकी क्र मांक एमएच ३६/आर-१९६७ ने जात होते. दरम्यान, ढिवरवाडा जंगलातील वळणानजिक विरुद्ध दिशेने दूध वाहून नेणार्या मेटॅडोरने (क्र . एमएच ०२/एक्सए-६९७९) दुचाकीला जोरदार धडक दिली. नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेवून घटनेची माहिती पोलिसांना दिली. या अपघातात गळीराम मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला. तर सतीश मारबते याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेतच मृत्यू झाला.
सदर मेटॅडोर भंडारा येथील जैन डेअरी कारखान्याचा आहे. चालक रविंद्र श्रीपत तागडे (३५) रा. शुक्र वारी वॉर्ड, भंडारा हा अपघातानंतर पसार झाला. अपघातग्रस्त दोन्ही वाहन पोलिसांनी मुख्यालयात जमा केले आहेत. करडी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सहाय्यक फौजदार अश्विन मेहर व नायक शिपाई विजय नासरे करीत आहेत. (वार्ताहर)