शेतकऱ्यांची लुबाडणूक : सहा उत्पन्न बाजार समित्यांकडून कारवाईच नाहीगोंदिया : दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांना आपला धान विकल्याशिवाय पर्याय नाही. पण हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अगतिकतेचा फायदा घेत ठिकठिकाणी व्यापाऱ्यांकडून कमी भागात शेतकऱ्यांकडील धान विकत घेतला जात आहे. या नियमबाह्य खरेदीला रोखण्यासाठी त्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यास कृषी उत्पन्न बाजार समित्या कुचराई करीत आहे.यावर्षी कमी पाऊस आणि नंतर रोगाच्या प्रादुर्भावातून वाचविलेल्या धानाची शेतकऱ्यांनी चुरणी-मळणी केली. दिवाळीपूर्वी धान विकुन दिवाळीचा सण साजरा करण्याची आशा त्यांना होती. मात्र आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होऊ न शकल्याने त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे नाईलाजास्तव ते धान व्यापाऱ्यांना पडक्या भावात विकावे लागले. ठिकठिकाणचे व्यापारी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट करीत आहेत. मात्र त्या व्यापाऱ्यांना अभयदान देण्याचे काम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून सुरू आहे. आधारभूत किमतीच्या कमी किमतीत व्यापाऱ्यांनी धान खरेदी केली असताना त्या व्यापाऱ्यांवर अद्याप कारवाईच झालेली नाही. गोरेगाव तालुका वगळता जिल्ह्यात कोणत्याच कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी चुकीच्या पध्दतीने धान खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केलेली नाही. (तालुका प्रतिनिधी)
व्यापाऱ्यांना बाजार समित्यांचे अभय
By admin | Updated: November 10, 2015 00:49 IST