नरेश डोंगरे / गोपाळकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :भंडारा येथील डिफेन्स फॅक्टरीत (आयुध निर्माणित) आज सकाळी भीषण स्फोट झाल्याने आत मध्ये काम करणाऱ्यांपैकी सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भंडारा शहराच्या दक्षिणेला साधारणता १५ किलोमीटर दूर अंतरावर जवाहरनगर जवळ भंडारा आयुध निर्माणी आहे. येथे अति उच्च दर्जाच्या बारूद आणि स्फोटकांची निर्मिती, साठवणूक केली जाते. त्यासाठी वेगवेगळे सेक्शन आणि वेगवेगळ्या इमारती आहेत. यातीलच लो टेंपरेचर प्लास्टिक एक्सप्लोसिव्ह (एलटीपीई )च्या इमारतीत बारूदचे गोळे बनविण्याचे काम सुरू असताना सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला.
हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की, एलटीपीईची भली मोठी इमारत जमीन दोस्त झाली आणि त्यामध्ये काम करणाऱ्या अनेक कामगाराच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या.
स्फोटांचा आवाज आणि त्यामुळे बसलेल्या हादऱ्यांमुळे आजूबाजूच्या सुमारे दहा ते बारा किलोमीटर अंतराच्या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. या भीषण दुर्घटनेची कल्पना येताच आयुध निर्माणीतून धोक्याचा सायरन वाजला अन् आजूबाजूच्या गावातील नागरीक मोठ्या संख्येने घटनास्थळाकडे धावले.
माहिती कळताच जिल्हाधिकारी संजय कोलते, पोलीस अधीक्षक नूरुल हसन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह अनेकांनी तिकडे धाव घेतली. घटनास्थळावरचे भीषण दृश्य बघता प्रशासनाने मोठ्या प्रमाणात अग्निशमन दलाचे बंब, २४ ॲम्बुलन्स आणि चार मोठ्या क्रेन बोलून घेतल्या.
इमारतीच्या मलब्यात अनेक जण दबले होते. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. वृत्त लिहिसतोवर ९ जणांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी चार मृत झाले होते. नंतर पुन्हा तिघांचे मृतदेह सापडले. जखमी पाचही जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. जखमींना भंडाऱ्यातील स्पर्श हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
स्फोट झाल्याचे कळताच फॅक्टरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी आयुध निर्मानी तसेच बाजूच्या रुग्णालयासमोर प्रचंड गर्दी केली. दुपारी ३.३० च्या सुमारास मृतकांची नावे संबंधित सूत्रांनी स्पष्ट केल्यानंतर नातेवाईकांच्या भावनांचा भडका उडाला. त्यांनी एकच आक्रोश सुरू केला. त्यामूळे परीसरात तणाव निर्माण झाला.
पंचक्रोशी हादरली, प्रचंड दहशत
या भीषण स्फोटामुळे घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसराला जबर हादरा बसला आणि नागरिकांत प्रचंड दहशत निर्माण झाली. इमारतीतील लोखंडी पत्रे तसेच इतर अवजड साहित्य पत्त्याप्रमाणे उंच हवेत उडून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पडले. त्यावरून या स्फोटाच्या तीव्रतेची कल्पना यावी.
मृतांची नावे चंद्रशेखर गोस्वामी (वय ५९ वर्षे),मनोज मेश्राम (५५ वर्षे),अजय नागदेवे (५१ वर्षे),अंकित बारई (२०वर्षे), लक्ष्मण केलवदे (वय अंदाजे ३८),अभिषेक चौरसिया (वय ३५) आणि धर्मा रंगारी (वय ३५ वर्ष)
जखमीची एन पी वंजारी (५५ वर्षे), संजय राऊत (५१ वर्ष),राजेश बडवाईक (३३ वर्षे), सुनील कुमार यादव (२४ वर्षे) जयदीप बॅनर्जी (२२ वर्षे)