चिचाळ : इंदिरा सागर गोसीखुर्द प्रकल्पाकडे जाणाऱ्या अल्प बसफेऱ्यांमुळे विद्यार्थी, प्रवासी व पर्यटकांची कोंडी होत आहे. अड्याळ गोसे पवनी व गोसे अड्याळ फेऱ्या सुरु करण्याची मागणी या मार्गावरील जनतेनी केली आहे. विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द इंदिरा सागर प्रकल्पावरुन भंडारा गोसे पवनीमार्गे धावणाऱ्या बसेस सकाळी ८.१५ वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ६.३० वाजता तर पवनी गोसे भंडारा सकाळी ६.१५, ११.१५ व सायंकाळी ६.३० वाजता बसेस धावतात, या धावणाऱ्या अल्प बसफेऱ्यामुळे शालेय विद्यार्थी व पर्यटकांची गैरसोय होत आहे. या मार्गावरील इटगाव कुर्झा, गोसीखुर्द, गोसे बु., मेंढा, पाथरी व चिचाळ येथील विद्यार्थी शिक्षणासाठी अड्याळ, कोंढा, पवनी, भंडारा जिल्हा व तालुकास्थळ पवनी येथे विद्यार्थ्यांना व नागरीकांना अल्प बस फेऱ्यामुळे त्रास सहन करावा लागतो. सदर मार्गावरील विद्यार्थी अड्याळ येथे शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जातात. पंरतु शालेय वेळेवर बसेस नसल्याने विद्यार्थी नवेगाव पाले येथे सायकलने प्रवास करुन नवेगाव येथून भंडारा-पवनी राष्ट्रीय मार्गे २७१ वरुन अड्याळला जातात. अड्याळ येथील बसस्थानकावर शाळा संपल्यानंतर नवेगाव येथून सायकलने स्वगावी जावे लागते. अनेकदा भंडारा पवनी मार्गे बसेस उशिरा आल्यास विद्यार्थ्यांना रात्री ७ ते ८ वाजता गावाला जावे लागते. त्या वेळेवर गोसे मार्गे धावणारी एकही बस नाही. विद्यार्थ्यांना अकारण मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. सदर मार्गावर इंदिरा सागर गोसे प्रकल्प असुन येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. मात्र अपुऱ्या बस फेऱ्याने प्रवाशांची व पर्यटकांची गैरसोय होत आहे. सदर मार्गावरुन अगदी १० किमी अंतरावर भंडारा- पवनी राष्ट्रीय महामार्ग क्र. २७१ आहे. या मार्गावरुन पवनी-भंडारा व भंडारा- पवनी बसेसची वर्दळच असते. गोसे मार्गे धावणाऱ्या कुर्झा, इटगाव, गोसे, मेंढा, पाथरी व चिचाळ या गावापासून राष्ट्रीय मार्गावर (नवेगाव) येणाऱ्या अपुऱ्या बसेस असल्याने विद्यार्थ्यांना व प्रवाशांना सायकल, दुचाकीने कोंढा, नवेगाव येथे यावे लागते.एस. टी. महामंडळाने विद्यार्थी, प्रवाशी व पर्यटकांचे गैरसोय बघता अड्याळ गोसे पवनीसाठी दुपारी २ वाजता, सायंकाळी ४ वाजता तर, पवनी गोसे अड्याळसाठी दुपारी १ वाजता, ३ वाजतादरम्यान बसेस सुरु करण्याची मागणी गोसीखुर्द प्रकल्प मार्गावरील विद्यार्थी, पर्यटक व जनतेनी केली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)
अल्प बसफेऱ्यामुळे अनेकांची कोंडी
By admin | Updated: August 28, 2015 01:08 IST