भंडारा : शहराचा विकास तेथील रस्त्याच्या विकासावर अवलंबून असतो असे म्हटले जाते. परंतु शहरातील काही मुख्य रस्ते सोडले तर उपरस्त्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात मागील दोन वर्षांपुर्वी मुख्य रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट होती. शहरातील रस्त्यांची विभागणी क्षेत्रनिहाय झालेली आहे. यातील काही रस्ते नगरपालिकेच्या हद्दीत तर काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येते. मागील वर्षी बांधकाम विभागाच्या हद्दीत येत असलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते. यात किमान दोन वर्ष तरी रस्त्यावर खड्डे पडणार नाही याची हमी देण्यात आली होती. मात्र सहा महिन्यातच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. याचा उत्कृष्ठ नमुना जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक मार्ग ते मुस्लिम लायब्ररीपर्यंतच्या रस्तयाची पाहणी केल्यानंतर लक्षात येईल. अधिकाऱ्यांनी गुणवत्तापुर्ण केलेल्या कामाची ही पावतीच म्हणावी लागेल. डागडुजीच्या नावाखाली लक्षावधी रूपयांची उधळपट्टी करण्यात आली. मात्र दर्जेबाबत कुणीही बोलायला तयार नाही. भंडारा शहरातील राजीव गांधी चौक ते खात रोडकडे (चव्हाण हॉस्पिटल मार्ग) जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पटले आहे. या मार्गावर रुग्णालय, शिकवणी वर्ग, सभागृह यासह खात रोडला जोडणारा रस्ता म्हणून ओळखला जातो. कित्येक वर्षांपासून हा रस्ता उखळलेल्या स्थितीत असतानाही त्याची डागडुजी किंवा पुर्नबांधणी करण्यात आली नाही. रात्रीच्या वेळेस या मार्गावर पथदिवे बंद असल्याने विशेषत: विद्यार्थीनींची सुरक्षा धोक्यात येत असते. याशिवाय शहरातील सहकार नगर येथील जोड रस्ता, सिव्हील लाईन परिसरातील अंतर्गत रस्ते, जिल्हा सामाजिक न्याय भवनाजवळील रस्ता, संत तुकडोजी महाराज पुतळा परिसरातून चांदणी चौकाकडे जाणारा रस्ता, सामान्य रुग्णालय चौक ते जुन्या रुग्णालयाकडे जाणारा रस्ता, राजगोपालाचारी वॉर्डातील रस्ते उखडलेले आहेत. या परिसरातील रस्ते नागरिकांसाठी धोक्याचे ठरू पाहत आहेत. नगरपालिका व बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असलेले रस्ते तात्काळ डागडुजी अथवा त्याची पुर्नबांधणी करणे महत्वाचे असतानाही या कामात प्रचंड दिरंगाई करण्यात येते. भंडारा शहरात आठ प्रभाग असून ३२ वॉर्ड आहेत. शहरातील लोकसंख्या दीड लाखांच्या वर आहे. कर रूपातून नगरपालिका प्रशासनाला कोट्यवधी रूपयांचा महसूल मिळत असतो. परंतु यातील बहुतांश निधी खरच विकास कामांसाठी खर्च होतो काय, हा सवाल सामान्यांना भेडसावणारा आहे. रस्ते, स्वच्छ पाणी, पथदिव्यांची सोय यासह मुलभूत सोयी-सुविधा नगरपालिका प्रशासनाने इमाने इतबारे पुरवाव्यात, अशी सामान्य नागरिकांची इच्छा आहे. मात्र स्वार्थाचे राजकारण व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव तसेच निधीचा वाणवा ही मुख्य कारणे शहराच्या विकास कामात अडथडा निर्माण करू पाहत आहेत. यावर नागरिकांनीच पुढाकार घेवून विकास कामांना चालना देण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडे तगादा लावण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
मुख्य रस्ते 'गुड' तर उपरस्त्यांचे हाल
By admin | Updated: December 10, 2015 00:57 IST