आरक्षण जाहीर : लाखांदुरात अपक्षाच्या गळ्यात विजयाची माळ भंडारा : राज्यातील नवनिर्मित नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत सोमवारला मुंबईत काढण्यात आली. यात जिल्ह्यातील मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर या तिन्ही नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदावर महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात महिलाराज येणार आहे.१७ सदस्यीय नगरपंचायतीत लाखांदूर येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला, मोहाडी व लाखनी येथे ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी अध्यक्षपदाचे आरक्षण निघाले आहे. यानुसार लाखांदुरात नीलम हुमणे अपक्ष आणि निलिमा टेंभुर्णे काँग्रेस यांच्या निवडणूक होणार आहे. मोहाडीत रागिणी सेलोकर, स्वाती निमजे, गीता बोकडे, कविता बावणे यांच्यापैकी एकाची वर्णी तर लाखनीत कल्पना भिवगडे, गीता तितीरमारे यांची वर्णी लागू शकते.लाखांदुरात भाजपला स्पष्ट बहुमत असताना आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण निघाल्यामुळे भाजपकडे उमेदवार नाही. त्यामुळे अपक्ष हुमणे यांना अध्यक्ष बनविण्याशिवाय भाजपला पर्याय नाही. विशेष म्हणजे, नीलम हुमणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली होती. शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्या अपक्ष रिंगणात होत्या. भाजपच्या टिनाली केळकर यांचा त्यांनी केवळ एक मताने पराभव केला. आता नगराध्यक्षपदही न मागता त्यांच्याकडे चालून आले आहे. याला म्हणतात ‘भगवान देता है तो छप्पर फाडके’ (जिल्हा प्रतिनिधी)
नगराध्यक्ष निवडणुकीत महिलाराज
By admin | Updated: November 10, 2015 00:43 IST