भंडारा तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींची मतमोजणी येथील तहसील कार्यालयात तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. सकाळपासूनच निकाल ऐकण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. रावणवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध झाली होती. ३५ पैकी २२ ग्रामपंचायतींवर भाजपने तर १३ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने आपले वर्चस्व कायम केले आहे. तुमसर तालुक्यातील १८ पैकी १२ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडी तर सहा ग्रामपंचायतींवर भाजपने झेंडा रोवला. निकाल ऐकण्यासाठी तहसील कार्यालयात मोठी गर्दी दिसत होती. माेहाडी तालुक्यातील १७ पैकी १० ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडी तर सहा ठिकाणी भाजप आणि एका ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाडीने झेंडा रोवला. पवनी तालुक्यातील २७ पैकी २२ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडी तर पाच ठिकाणी भाजपने झेंडा रोवला. साकोली तालुक्यातील २० पैकी १३ ग्रामपंचायतींवर भाजप तर सात ठिकाणी महाविकास आघाडीची सरशी ठरली. लाखनी तालुक्यातील २० पैकी १५ ग्रामपंचायतींवर भाजप तर चार ठिकाणी महाविकास आघाडी आणि एका ठिकाणी स्थानिक विकास आघाडीने विजय संपादित केला. लाखांदूर तालुक्यातील ११ पैकी सहा ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडी तर चार ग्रामपंचायतींवर भाजप आणि एका ठिकाणी स्थानिक आघाडीने आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
ग्रामपंचायतींची निवडणूक पक्षीय चिन्हावर झाली नसली तरी मतमोजणीनंतर भाजप आणि महाविकास आघाडीने आपल्या वर्चस्वाचा दावा केला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी ८५ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने वर्चस्व मिळविल्याचे सांगितले, तर भाजप ९० ग्रामपंचायतींवर झेंडा रोवल्याचे सांगत आहे. याबाबत सोशल मीडियावर विविध पोस्ट फिरत आहेत. एकंदरीत या निवडणुकीने ग्रामीण परिसर ढवळून निघाला होता.
बॉक्स
पारडीत ईश्वर चिठ्ठीने उमेदवार विजयी
लाखांदूर तालुक्यातील पारडी ग्रामपंचायतीच्या प्रभाग तीनमधील दोन उमेदवारांना समान मते मिळाली. विशाल यशवंत मेश्राम आणि अरविंद लक्ष्मण रामटेके या दोघांनाही प्रत्येकी १३७ मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ईश्वर चिठ्ठी काढली, त्यात अरविंद रामटेके विजयी झाले.
बॉक्स
गुलाल उधळून विजयोत्सव
जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांसमोर निवडणूक निकाल ऐकण्यासाठी आलेल्या नागरिकांनी विजयोत्सव साजरा केला. एकेक उमेदवाराच्या विजयाची घोषणा होत होती, तेव्हा समर्थक जोरदार घोषणाबाजी करून गुलालाची उधळण करीत होते. संपूर्ण पॅनल निवडून आलेल्या गावातील नागरिकांच्या तर उत्साहाला उधाण आले होते. पराभूत झालेले उमेदवार आल्यापावली परतताना दिसत होते. निवडणूक निकालानंतर गावी पोहोचलेल्या विजयी उमेदवारांचे गावाच्या वेशीवरच जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर सर्वत्र दिसत होता.
बॉक्स
भंडाऱ्यात १० तर पवनी सात ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा दावा
भंडारा विधानसभा मतदारसंघातील भंडारा तालुक्यातील दहा आणि पवनी तालुक्यातील सात ग्रामपंचायतींवर शिवसेनेने विजय संपादित केल्याचा दावा करण्यात आला. भंडारा तालुक्यातील सालेबर्डी, उमरी, दाभा, लावेश्वर, टवेपार, मांडवी, बेलगाव, पचखेडी, पलाडी, चोवा आणि पवनी तालुक्यातील पिलांद्री, खांबाडी, केसलवाडा, कातुर्ली, भेंडाळा, धानोरी, सिरसी ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात हा विजय मिळविल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
बॉक्स
विधानसभा अध्यक्षांच्या तालुक्यात भाजप
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या गृहतालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. २० पैकी १३ ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व निर्माण केले, तर सात ग्रामपंचायती महाविकास आघाडीने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. लाखनी तालुक्यात भाजपने सर्वाधिक १५ ग्रामपंचायतींवर तर भंडारा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींवर झेंडा रोवला आहे.