लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विधानसभा निवडणुकीचा ज्वर ग्रामीण भागात चढला असून हॉटेल, टपरी, चावडी असो की खासगी बैठक सर्वत्र एकच चर्चा दिसत आहे. उमेदवारांच्या आघाडीसोबत जातीय समीकरणांवर प्रत्येकजण तावातावाने बोलताना गावागावांत दिसत आहे. राजकीय नेत्यांच्या प्रचार सभांनी ग्रामीण वातावरण ढवळून निघत असून आता चर्चेचा केवळ एकच विषय तो म्हणजे विधानसभा निवडणूक़यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा बोलबाला दिसत असला तरी चार जण एकत्र आले की, निवडणुकीवरच गप्पा रंगताना दिसत आहे. भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदार आहेत. निवडणूक हा विषय ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक आहे.ग्रामपंचायतीची असो की लोकसभेची. त्यावर गावात चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. गावपुढारी राजकीय विश्लेषकाच्या भूमिकेत दिसत आहे. आपल्या मतदारसंघासोबतच राज्याच्या कानाकोपऱ्यातील निवडणुकीवर चर्चा झडत आहे. नेत्यांच्या भाषणावरही गावागावांत विश्लेषन करणारी मंडळी कमी नाही. कोणत्याही हॉटेल, पानटपरीवर आता दोन व्यक्ती समोर आले की काय म्हणजे निवडणूक अशीच विचारणा केली जाते.प्रत्येकजण तटस्थपणे निवडणुकीचे विश्लेषन करण्याचा प्रयत्न असला तरी त्यात उमेदवाराची महती सांगून कुणालातरी पुढे करण्याचा प्रयत्न केला जातो.कुणाकडे पाहुणा आला की त्याचाही विषय निवडणूक हाच असतो. तुमच्या मतदारसंघात नेमकी काय स्थिती आहे, याचा अंदाज घेतला जातो. राजकारणाशी काडीमात्र संबंध नसणारेही आता एखाद्या वाहिणीवरील राजकीय विश्लेषकासारखे चर्चा करताना दिसून येते.या चर्चांचा उद्देश कोणताच नसला तरी ग्रामीण जीवनात राजकीय गप्पा विरंगुळा झाले आहे.ग्रामीण भागात जातीय समीकरणांची मोठी पकड असते. उमेदवार कोणत्या समाजाचा आहे येथपासून कोणता समाज कुणाच्या पाठीमागे राहील. ऐन वेळेवर कोण कसा दगा देईल, यावरही ठामपणे मत मांडणारे दिसतात. यात मात्र माझेच खरे असे म्हणणारे आहे.जातीय समीकरणाला निवडणुकीत झाला नसला तरी उमेदवार असो की कार्यकर्ते निवडणुकीत जातीचाच आधार घेतात हे आजपर्यंतच्या निवडणुकांवरून सिद्ध झाले. याही निवडणुकीत तेच दिसत आहे.गावपुढाऱ्यांची दिवाळीविधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गावपुढाºयांची दिवाळीपुर्वीच दिवाळी सुरू झाली आहे. गावात प्रभाव असणारे अनेकजण आता नेत्यांच्या मागेपुढे फिरताना दिसत आहे. दुचाकीवर कायम असणारे गावपुढारी सध्या अलिशान वाहनाशिवाय फिरताना दिसत नाही. रात्री घरचे जेवणही त्यांना गोड लागेनाशी झाले आहे. गावानजीकच्या किंवा शहरातील हॉटेलमध्ये गावपुढाºयांची गर्दी वाढू लागली आहे. हेच पंधरा दिवस आहे. नंतर आपल्याला कोण विचारतो, असे म्हणत गावपुढारी दिवाळी साजरी करीत आहे.भाऊ आम्ही तुमचेच...प्रचारासाठी प्रत्येक पक्षाचे उमेदवार, पुढारी, कार्यकर्ते गावागावांत जात आहे. हात जोडून मतांचा जोगवा मागत आहे. दारापुढे येणाºया प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला भाऊ आम्ही तुमचेच, असे म्हणत वेळ मारून नेली जात आहे. कुणाला आताच नाराज कशाला करायचे. वेळ आल्यावर मत कुणाला द्यायचे हे ठरवू, असे चित्र ग्रामीण भागात सध्या तरी दिसत आहे.
Maharashtra Election 2019 ; निवडणुकीचा ज्वर चढला, गावागावांत रंगले गप्पांचे फड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 06:00 IST
ग्रामपंचायतीची असो की लोकसभेची. त्यावर गावात चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. गावपुढारी राजकीय विश्लेषकाच्या भूमिकेत दिसत आहे. आपल्या मतदारसंघासोबतच राज्याच्या कानाकोपऱ्यातील निवडणुकीवर चर्चा झडत आहे. नेत्यांच्या भाषणावरही गावागावांत विश्लेषन करणारी मंडळी कमी नाही.
Maharashtra Election 2019 ; निवडणुकीचा ज्वर चढला, गावागावांत रंगले गप्पांचे फड
ठळक मुद्देप्रचाराची रणधुमाळी : हॉटेल, टपरी, चावडीत एकच चर्चा