तुमसर : तुमसर तालुक्याच्या सीमा मध्यप्रदेशलाभिडल्या आहेत. मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती गावातील नागरिकांनी महाराष्ट्राच्या सीमेत अतिक्रमण केल्याची धक्कादायक माहिती आहे. शासकीय भूखंडाचे पट्टे दिलेल्या पाथरी गावातील काहींना ते भूखंड तथा तयार घरे मध्यप्रदेशातील रहिवाशांना विकल्याची माहिती आहे.तुमसर बालाघाट आंतरराज्यीय महामार्ग नाकाडोंगरी गावावरून जातो. बावनथडी नदी काठावर पाथरी हे गाव आहे. या गावातील गरीबांना भूखंडाचे पट्टे देण्यात आले होते. त्या नागरिकांनी भूखंड तथा भूखंडावरील घरे मध्यप्रदेशातील नागरिकांना विक्री केली आहेत. सीमावर्ती गावातील नागरिक सहज राज्यांच्या सीमा ओलांडून जातात. आठवडी बाजाराकरिता तथा रोजगारानिमित्त त्यांचे जाणे येणे आहे. मध्यप्रदेशातील सीमावर्ती गावातील नागरिकांनी पाथरी येथे घरे बांधली. भूखंड येथे शासनाने पाथरीतील गरीब नागरिकांना दिली होती. गावात पक्की घरे आहेत. भूखंड रिकामे आहे. जास्त किंमत आल्याने ती विकण्यात आली. काहींनी तयार घरे विकली आहेत. तर काहींनी पक्के घरे तयार करीत आहेत. हा सर्व प्रकार येथे सर्रास सुरु आहे. शासकीय भूखंड विक्री करता येत नाही. एका कागदावर तथा मुद्रांकावर लिहून विक्री करण्याचा येथे गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे.गावातील तलाठी, ग्रामपंचायत व ग्रामसेवकांना हा प्रकार निश्चितच माहीत आहे. परंतु कुणीच याबाबत दखल घेण्यास तयार नाहीत. अर्थकारणामुळे येथे निश्चितच दुर्लक्ष केले जात आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी केली तर मोठे घबाड बाहेर येईल. संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची येथे गरज आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
भूखंड महाराष्ट्राचे अतिक्रमण मध्य प्रदेशचे
By admin | Updated: October 9, 2014 22:57 IST