पवनी : स्थानिक टॅ्रव्हल्स एजन्सीमार्फत पवनी-नागपूर व नागपूर-पवनी लक्झरी बस दिवसभर ये-जा करतात. गुरुकृपा ट्रव्हल्सची लक्झरी बस क्र. एम एच ३१, सी क्यू ९३३३ नागपूरवरुन परत आल्यानंतर नेहमीप्रमाणे रात्री नागपूर मार्गाच्या कडेला उभी होती. पहाटेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलीस पथकास ट्रव्हल्सच्या इंजिनमधून आगीचे लोळ बाहेर पडताना दिसले. काही करण्यापूर्वीच बसने पेट घेतला व बस पूर्णत: पेटली.नागपूरला ये-जा करणाऱ्या खाजगी ट्रव्हल्सच्या बसेस जवाहर गेट समोर नागपूर रोडच्या कडेला उभ्या केलेल्या असतात. त्याच ठिकाणाहून बसेस सोडण्यात येताना उभ्या असलेल्या बसला पहाटे २ वाजताच्या सुमारास आग लागण्याची ही पवनीतील पहिलीच घटना आहे. त्यामुळे हा घातपात असेल का? असा विचार लोक करु लागले आहेत. बसला आग लागली तेव्हा रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक धनश्री डाहाके व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात व संबंधितांना घटनेची माहिती दिली. नागरिक तातडीने घटनास्थळी पोहचले त्यांनी बसची आग विझविण्याचा प्रयत्न केला. पंरतू साध्या पध्दतीने आगीने विझविणे शक्य नसल्याने बसची राखरांगोळी झाली. मात्र वेळीच उपाययोजना केल्याने अनर्थ टळला. पालीकेचे अग्नीमशन वाहन अद्यापही कुलूपबंद असल्याने नागरिकांनी परिश्रम घेवून आग आटोक्यात आणली. त्यामुळे आजूबाजूला असलेले दुकाने व वाहने सुरक्षित राहिली. (तालुका प्रतिनिधी)
लक्झरी बसला आग
By admin | Updated: February 28, 2017 00:25 IST