ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कुणबी आणि पोवार समाजाचे प्राबल्य असलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात यंदा जातीय समीकरणाला मोठे महत्व आले. उमेदवारांच्या निवडीपासून आता प्रचारापर्यंत जातीचीच चर्चा होत आहे. अशा समीकरणात मतदार कुणाच्या पाठीशी उभा राहणार आणि जातीचे मते कुणाला तारतात यावर उमेदवारांचे भविष्य आहे. कुणबी आणि पोवार समाजाच्या मतदारांची बेरीज एकुण मतदारांच्या निम्यापेक्षा अधिक आहे. मात्र इतर समाजाचीही मते या निवडणुकीत निर्णयाक ठरू शकतात.लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. नेत्यांच्या प्रचार सभांना उधान आले आहे. प्रत्येकजण विजयाचा दावा करीत असला तरी खरी लढत राष्ट्रवादीचे नाना पंचबुध्दे आणि भाजपाचे सुनील मेंढे यांच्यातच होत आहे. असे असले तरी या मतदार संघाचा इतिहास बघता बहुजन समाज पार्टी आणि अपक्ष उमेदवारही महत्वपूर्ण भुमिका बजावतात. एखाद्याचे विजयाचे गणित बिघडवू शकतात.राष्ट्रवादी आणि भाजपाने उमेदवारी देतांना कुणबी समाजाला प्राधान्य दिले. या मतदारसंघात सुमारे २७ टक्के कुणबी मतदार असल्याचे सांगितले जाते. परिणामी दोन्ही पक्षांनी कुणबी समाजालाच तिकीट वाटपात महत्व दिले. यावरून पोवार समाजात नाराजीचा सुर आहे. या मतदारसंघात कुणबी मतदारांच्या खालोखाल सुमारे २५ टक्के पोवार समाजाचे मतदान आहे.ही नाराजी माजी खासदार खुशाल बोपचे आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी नामांकन दाखल करुन व्यक्तही केली. माजी खासदार खुशाल बोपचे यांनी माघार घेतली असली तरी राजेंद्र पटले बंडखोर म्हणून उभे आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पोवार समाजाचे निर्णायक मते कुणाला जाणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत जात हा फॅक्टर महत्वाचा असला तरी शेतकरी, बेरोजगारी, सिंचन, उद्योग हे प्रश्नही महत्वाचे ठरत आहे. सत्ताधारी पक्षाला मतदार या प्रश्नावरुन थेट जाब विचारत आहेत.बसपा, अपक्षांचे मताधिक्यही ठरणार महत्त्वाचेलोकसभा निवडणुकीत आठ अपक्षांसह १४ उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपात थेट टक्कर होत आहे. बंडखोर, बसपा आणि अपक्ष उमेदवाराचे मताधिक्य तेवढेच महत्वाचे आहे. गत निवडणुकींचा इतिहास बघितला तर बसपा आणि अपक्षांनीच अनेकांच्या विजयाचे गणित बिघडविले आहे. आता निवडणुकीत नेमके काय होते, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
उमेदवारांची संख्या घटलीदहा महिन्यांपुर्वी झालेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत १८ उमेदवार रिंगणात होते. यंदा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीज १४ उमेदवार आपले भाग्य अजमावित आहेत. उमेदवाराची संख्या यंदा निश्चितच घटलेली आहे. मात्र गत पोटनिवडणुकीच्या मतांवर नजर टाकल्यास दोन प्रमुख उमेदवारांनीच ८८.१५ टक्के मते घेतली होती. तर इतर सर्व १६ उमेदवारांच्या मतांची टक्के केवळ ११.८५ होती.