चाराटंचाई : गावोगावी दूध, शेणखताची चणचणभंडारा : पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. यासाठी जनावरांच्या चारा पाण्याची भेडसावणारी समस्या कारणीभूत ठरत आहे. शेतकरी, शेतमजुरांनी जनावरे मिळेल त्या भावात विक्रीचा सपाटा सुरु केल्याने गावरानी जनावरे कमी होत आहे. देशातील ९० टक्के जनता आजही कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. पूर्वी शेतीच्या मशागतीसाठी शेतकरी बैलांचा वापर करायचे. परिणामी शेतकऱ्यांच्या जीवा भावाचा सखा म्हणून बैलांची ओळख होती. आधुनिक काळात विज्ञानाच्या प्रगतीमुळे यांत्रिक शेतीकडे शेतकरी वळत आहेत. दुसरीकडे सालगड्यांचे वार्षिक वेतन दीड ते दोन लाखांवर पोहचले आहे. परिणामी औताने शेती करणे शेतकऱ्यांना परवडनारे नाही. बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पूर्वी शेतकऱ्यांच्या अंगणात बैलांची दावण दिसणे हे त्यांच्यासाठी भूषणावह होते. तथापि आता बैलांच्या जोड्या निर्माण करणाऱ्या गोमाताच नष्ट होत आहे. विदर्भातील गावरानी बैल कष्टाळू बैल म्हणून ओळखले जातात. त्यांना पूर्वी अधिक मागणी होती. शेतकरी कधी काळी बैल व पाळीव जनावरांसाठी शेतात कुरण राखून ठेवायचे. आता कुरणेही नष्ट होत आहेत. जनावरांपासून मिळणारे दूध, दही, लोणी, तूप शेतकऱ्यांच्या घरीच बनविले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात दूध दुभते राहात होते. ग्रामीण भागात दुभाची धवलक्रांती होती. लग्नकार्यप्रसंगी लागणारे दूध, दही गावातच मिळत होते. सोबतच शेणखत तयार होत होते. शेतीचा पोतही सुधारत होता. रासायनिक खतांची गरजही पडत नव्हती. प्रत्येक गावात दोन चार गुराखी जनावरांचे कळप जंगलात चारायला नेत होते. आता जंगले नष्ट होऊ लागल्याने जनावरांना चारा मिळणे कठीण झाले आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई असल्याने जनावरांना पिण्यासाठी व धुण्यासाठी पाणीही मिळत नाही. चारा- पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी, मजुरांनी गेल्या १० वर्षात पाळीवर जनावरे विकण्याचा सपाटाच सुरु केला. विक्रीस काढलेली जनावरे घेण्यास पुन्हा दुसरे शेतकरी व शेतमजूर उत्सुक नसतात. त्यामुळे आता दुधाळ व धष्टपुष्ट जनावरे सुद्धा दुसऱ्यालाच विकावी लागतात. कत्तलखाने आता दुधाळ व धष्टपुष्ट जनावरांनी भरलेले दिसतात. ग्रामीण भागात दुधाचे वाहणारे पाट बंद झाले. पिशवीचे दूध विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवरच ओढविली आहे. (शहर प्रतिनिधी)
पशुधनात होतेय घट!
By admin | Updated: October 22, 2014 23:12 IST