भंडारा : स्थानिक प्रगती महिला महाविद्यालय भंडारा येथे निरंतर प्रौढ शिक्षण आणि विस्तार सेवा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कार्यक्रम प्राचार्य डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे प्रा. डॉ.सी.पी. साखरवाडे आणि कार्यक्रम अधिकारी प्रा.अंकुश चवरे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.प्रा.डॉ.सी.पी. साखरवाडे यांनी साक्षरता आणि शाश्वत विकास या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, साक्षरता एक मानवी जीवनाचे व्यवहारीक गुण आहे. ज्यामुळे मानव आपल्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात सतत विकास घडवून आणत असतो. शिक्षण घेतलेला व्यक्ती मानव कल्याण आणि राष्टूीय एकात्मकतेच्या दृष्टीने विचार करायला लागतो. देशात साक्षरतेचे प्रमाण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सतत वाढत आहे. देशात साक्षरतेचे प्रमाण २०११ च्या जनगणनेनुसार ७४.६५ टक्के आहे. जे १९५२ मध्येफक्त १२ टक्के होते. एक महिला साक्षर झाली तर ती संपूर्ण कुटुंबाला साक्षर करत असते. साक्षरतेतून जाणीव जागृती झालेल्या महिला आपल्या स्वबळावर चांगले जीवनमान जगत आहेत. २१ व्या युगात नवीन नवीन तंत्र व यंत्र निर्माण होत आहे. गावाचे नाते हे जगाशी जोडल्या गेले आहे. नवीन नवीन संशोधन लागत आहे. या शोधाची माहिती मिळावी याकरिता संगणक साक्षर होणे काळाची गरज ठरली आहे. जो व्यक्ती संगणक साक्षर नसेल तो व्यक्ती जगाशी नाते जोडण्यास मागे पडेल. म्हणून जो व्यक्ती साक्षर आहे त्यांनी आपली नैतिक जबाबदारी म्हणून दुसऱ्या निरक्षर व्यक्तीला साक्षर करण्याचा विडा उचलायलाच पाहिजे असे मार्गदर्शन केले. त्यानंतर अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे यांनी असे म्हटले की, निसर्गत:च मानवामध्ये बुद्धी, विचार, तर्क, कल्पना, विश्लेषण, संश्लेषण, आकलन, उपायोजन, रसग्रहण अशा अनेक शक्ती मानवाला प्राप्त झालेल्या आहेत. या शक्तीना चालना देण्याकरिता व्यक्तीला ज्ञानाची गरज आहे. ते ज्ञान मिळविण्याकरिता व्यक्तीला साक्षर होणे गरजेचे आहे आणि साक्षरतेकरिता अक्षराची ओळख होणे आवश्यक आहे. म्हणून अक्षर एक परिवर्तनाचे साधन आहे. तेव्हाच व्यक्ती आपला सर्वांगीण विकास साधेल व आपली जबाबदारी काय? कर्तव्य काय? आपले अधिकार काय? याची जाणीव होईल.संचालन नेहा मानापुरे हिने केले. तर आभार निशा कोल्हे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा.डॉ.जयश्री सातोकर, प्रा.विजया लिमसे, प्रा.डॉ.जी.एन. कळंबे, प्रा.डी.डी. चौधरी, प्रा.क्रिष्णा पासवान, प्रा.एस.एस. राठोड, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
साक्षरता राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक
By admin | Updated: September 11, 2014 23:18 IST