गडेगाव आगाराला भेट : अधिकाऱ्यांनी दिली वनाची माहितीभंडारा : जंगल म्हटले की, डोळ्यासमोर उभे राहते वन्यप्राणी व निसर्ग. मानवाच्या अधिक हस्तक्षेपाने जंगले आता तुरळक होत चाललेली आहेत. त्यासोबतच वन्य प्राणीही जंगलाच्या बाहेर आता सिमेंटचे दिसू लागले आहेत. अशा जंगलातील निसर्गाचा ठेवा बघण्यासाठी विद्यार्थ्यांनी गडेगाव आगारात भेट दिली. यावेळी वनाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वनाच्या संदर्भात माहिती दिली. एकेकाळी असलेली जंगले आता नष्ट करण्यात मानवानीच पुढाकार घ्यायला सुरुवात केली आहे. मिळेल तिथे अतिक्रमण करून शेती वाहने सुरु केली आहे. यासाठी लगतची वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात जंगलाची माहिती केवळ पुस्तकातच मिळेल असेही चित्र आता सर्वत्र दिसू लागले आहे. भावी पिढीला जंगल व त्यातील महत्वाच्या वृक्षांची माहिती सोबतच वन्यप्राण्यांचीही माहिती व्हावी या दृष्टीने गडेगाव येथील आनंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच गडेगाव आगारात भेट दिली. यावेळी प्रकाष्ट निस्कासन अधिकारी पी.जी. कोडापे, मुख्याध्यापक के.एम. खेडीकर, वनपरिक्षेत्राधिकारी एस.आर. शेख, प्रभारी वनपाल ललीतकुमार उचिबगले यांनी विद्यार्थ्यांना वनांच्या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. तिथे असलेल्या वृक्षांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सीमेंटच्या जंगलात राहणाऱ्या शाळेच्या या बालगोपालांना आगारात मिळालेल्या वृक्षांच्या सखोल माहितीने त्यांच्या अभ्यासासाठी मदत झाली. वनाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाने व निसर्गसानिध्याने हे सर्व विद्यार्थी भारावले. यावेळी कोडापे यांनी वन्यजीव टिकवून ठेवणे काळाची गरज आहे. त्यामुळे भविष्यात होणारे धोके टाळता येईल असे प्रतिपादन केले. तर ललितकुमार उचिबगले यांनी वन्यप्राणी व वने एकाच नाण्याची दोन बाजू असून जंगलाशिवाय प्राणी राहू शकत नाही व प्राण्यांशिवाय जंगल राहणे कठीण असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी विद्यार्थी निसर्ग सानिध्यात रमल्याची प्रचिती आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना जंगलाची महत्वाची माहिती दिल्याने अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्या ज्ञानात भर पडली. यावेळी आनंद विद्यालयाच्या शिक्षिका कटणकर, शिक्षक निमजे, येडेकर, बोरकर, जी.एस. गजभिये, एम.एच. कोचे आदी उपस्थित होते. संचालन ललीतकुमार उचिबगले यांनी केले तर आभार पंकज गहूकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
विद्यार्थी रमले निसर्गाच्या सानिध्यात
By admin | Updated: October 16, 2016 00:26 IST