आसगाव (चौ.) : जिल्ह्यातील नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम घेऊन प्रसिद्धीस पावलेल्या जि.प. हायस्कूल आसगाव येथील ९ वी व १० वी चे विद्यार्थ्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवास मिळणार आहे. यासाठी त्या विद्यार्थ्यांना १४ डिसेंबर रोजी संधी देण्यात आली आहे.प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देण्यासाठी जि.प. हायस्कूल आसगाव येथील शिक्षक प्रयत्नशील असतात. प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली ते सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत असतात. राज्यशास्त्राचे धडे गिरविताना त्यांना प्रत्यक्ष राजकारणाचे धडे मिळावे यासाठी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. शिक्षिका स्मिता गालफाडे यांनी भंडारा विधानसभेचे आमदार चरण वाघमारे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आमदारांना विधिमंडळाचे कामकाज पाहण्याची संधी मिळवून देण्याची विनंती केली. आ.वाघमारे यांनी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांना विधीमंडळाचे कामकाज अनुभवण्याची संधी मिळण्यासाठी प्रयत्न केले. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधन सचिव यांनी याबाबत जिल्हा परिषद हायस्कुल आसगावचे प्राचार्य यांना पत्र पाठवून अधिवेशन काळात विधानमंडळ कामकाज पाहण्यास परवानगी दिली आहे.परवानगी पत्रानुसार ५० विद्यार्थी व दोन शिक्षक हे दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १ वाजतापर्यंत विधानसभा गृहाचे तर दुपारी १ ते २ वाजतापर्यंत विधानपरिषद सभागृहाचे कामकाज पाहणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आता विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवयास मिळणार आहे. यासाठी विद्यार्थीसुद्धा अतिशय उत्सुक झाले आहेत. (वार्ताहर)
आसगाव शाळेतील ५० विद्यार्थी अनुभवणार विधिमंडळाचे कामकाज
By admin | Updated: December 14, 2015 00:44 IST