अडयाळ : अडयाळ आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे अधेमधे येणाऱ्या पावसाने कमी-अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचे पर्हेही जगले. फार मोजक्या शेतकऱ्यांनी वेळ पाहून रोवणी केली, परंतु आजही जास्तीत जास्त प्रमाणात रोवणी पाण्याच्या अभावाने अद्याप झाली नाही. शेतकऱ्यांनी वेळेत जर रोवणी आटोपली नाही तरी शेतकरी बुडणार आणि पाऊस पडला नाही आणि नेरला उपसा सिंचनचे पाणीही जर आता सोडण्यात आले नाही तरी शेतकरीच फसणार. यामुळे आता नेरला उपसा सिंचन योजना सुरू होणे गरजेचे झाले आहे. यासाठी आता शेतकरी भाजप युवा मोर्चा पवणी तालुकातर्फे तीव्र आंदोलन करण्याच्या स्थितीत आहेत.
नेरला उपसा सिंचन सुरू झाल्यानंतर शेतकरी कदाचित पाणीपट्टी कर भरेल की नाही? यामुळेच हे उपसा सिंचन आतापर्यंत सुरू झाले नाही का, असे प्रश्न असले तरी आतापर्यंत एकूण रकमेच्या २५ टक्के पाणीपट्टी कर वसूल झालेला नाही हेही तितकेच सत्य आहे. आज शेतीसाठी पाण्याची गरज कुणाला नाही? तसेच त्यातही अत्यंत महत्त्वाचे म्हणजे पाणीपट्टी करवसुलीला केव्हापासून सुरुवात करण्यात आली तेही महत्त्वाचे आहे. सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास उपविभागीय अभियंता पागोरा उपसा सिंचन उपविभाग क्रमांक १ कार्यालय आंबाडी येथे एक बैठक पार पडली. त्यात कोणते निर्णय घेण्यात आले हे अद्याप स्पष्टपणे कळू शकले नाही.
आज शेतकऱ्यांना नितांत गरज आहे. यासाठी दररोज शेतकरी नेरला उपसा सिंचन येथे जाऊन विचारणा करतात की, ‘साहेब कधी होणार नेरला उपसा सिंचन सुरू?’ हीच वसुली याआधीच एवढीच यंत्रणा कामावर लावून जर केली असती तर आज असे दिवस शेतकऱ्यांना पाहायला मिळाले असते का? यंदा गावात मुनादी देण्यात आली, तसेच शेतकऱ्यांच्या घरापर्यंत यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी तथा निर्माण झालेल्या पाणी वापर संस्थेतील पदाधिकारी पाणीपट्टी करवसुली करण्यासाठी जितकी धावपळ आता करताना दिसतात मग हीच कामे आधीच हळूहळू का होईना जर केली असती तर अशी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमीच असती, अशीही चर्चा सुरू आहे.