तलावांची उपेक्षा : दूषित पाण्यामुळे माशांचे आरोग्य धोक्यात तुमसर : राज्य शासनाने मामा तलावांचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. परंतु जिल्हा परिषदेचे जुने तलाव शेवटची घटका मोजत आहे. तुमसर शहरात सुमारे ५ हेक्टरमध्ये जिल्हा परिषदेचा तलाव आहे. या तलावात शहरातील सांडपाणी जमा होते. पाण्यात घातक जीवजंतूमुळे तलावाशेजारील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.तुमसर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तलावांची संख्या बऱ्यापैकी आहे. शहरात जिल्हा परिषदेचा सुमारे पाच हेक्टरमध्ये जुन्या शहराच्या मध्यभागी तलाव आहे. या तलावातील पाण्याच्या सिंचनाकरिता उपयोग करण्यात येतो. या तलावात शहरातील सांडपाणी जमा होतो. पाण्याचा रंग काळपट हिरवा पडला आहे. या तलावाशेजारील दोन्ही बाजूला नागरिकांची वस्ती आहे. तलावातील पाण्याचा उपयोग सिंचनाव्यतिरिक्त होत नाही. माशांच्या वाढीकरिता येथे पोषक पाणी नाही. तलावाच्या काठावरच चक्क शौचास बसणाऱ्यांची संख्या येथे मोठी आहे. दोन बाजूला सिमेंटच्या पायऱ्या येथे तयार करून लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. संबंधित विभागाचे या तलावाकडे दुर्लक्ष आहे.तलावातील पाणी शुद्ध कसे राहील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तलावाच्या काठावर येथे कचरा टाकला जातो. जिल्हा परिषदेचे या तलावाकडे दुर्लक्ष असल्याने या तलावाची मालकी दुसऱ्या विभागाकडे वर्ग करण्याची गरज आहे. जिल्ह्यात तलावांची उपेक्षा येथे सातत्याने होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
तलाव मोजताहेत शेवटची घटका
By admin | Updated: March 24, 2015 00:17 IST