तुमसर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तुमसर येथे मंगळवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांनी पीक कर्जाकरिता मोठी गर्दी केली. आज, बुधवारी अशीच गर्दी राहणार असल्याची माहिती आहे. अशा गर्दीमुळे बँकेतील कर्मचारी व शेतकऱ्यांना कोरोना संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही.
सर्वसामान्यांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेची ओळख आहे. त्यामुळे या बँकेत अनेक शासकीय योजनांचे पैसे वितरित करण्यात येतात. पीक कर्जाकरिता सध्या बँकेत गर्दी होत आहे. मंगळवारी बँकेत पाय ठेवायलाही जागा नव्हती. आज अशीच गर्दी राहणार असल्याची माहिती उपस्थितांनी दिली.
भंडारा जिल्ह्यासह तुमसर तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. बँकेतील कर्मचारी व क्रॉप लोन धारक यांनाही कोरोना संसर्गाची धोक्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांना सेवा देण्याकरिता बँकेची मजबुरी आहे. वेळेत सर्वांचे समाधान करणे आवश्यक आहे. क्रॉप लोन धारकांना वेळेत सेवा देणे आवश्यक आहे. सध्या तापमानाचा पारा वाढला असल्याने बाहेर ऊन व आत गर्दी अशी स्थिती येथे झाली आहे. एकाच वेळी गर्दी झाल्याने बँकेचा नाइलाज आहे.