युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्ककरडी(पालोरा) : पावसाने दडी मारल्याने रखडलेली रोवणी वेळेत करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. सिंचनाची सुविधा निर्माण करून रोवणी करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. मात्र आता मजुरांची टंचाई निर्माण झाली. त्यातून मजुरांची पळवापळवी सुरू असून अधिक मजुरीचे आमिष दिले जाते. शेतापर्यंत जाण्यासाठी वाहनाची सुविधा असल्याने करडी परिसरातील मजूर आता रोवणीसाठी गावापासून ३० ते ४० किमी अंतरावर रोवणीसाठी जात असल्याचे चित्र गावागावात दिसत आहे. पुष्य नक्षत्राच्या शेवटी झालेल्या पावसामुळे निलज बुज, निलज खुर्द, मोहगाव, देव्हाडा बुज, पालोरा, खडकी व परिसरातील ७० टक्के रोवणी झालेली आहेत. उर्वरित ३० कोरडवाहू शेतकऱ्यांचे रोवणे पाऊस थांबल्याने रखडले आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या धान पिकाच्या लागवडीसाठी स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत प्राधान्य दिले जाते. परंतु आता एकाच वेळी रोवणी आल्याने शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे गावागावातून मजूर शोधून त्यांना अधिक मजुरीचे आमिष दिले जाते. अधिक पैसे मिळत असल्याने मजूर बाहेरगावी जाण्यासाठी एका पायावर तयार होतात. गावापासून शेतापर्यंत जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली जाते. त्यामुळे मजुरांना सोयीचे होते. करडी परिसरातील मजूर आता ३० ते ४० किमी अंतरावरील गावात रोवणीसाठी जात आहे.
पारोग पद्धतीने मजुरीला पसंती- पाच दशकांच्या आधी आतासारखी रोवणीची गुत्ता (हुंडा) पद्धत नव्हती. त्यामुळे धानाची रोवणी करणाऱ्या महिला सकाळ पारोग पद्धतीने आणि दिवसा रोजीने धानाची रोवणी करीत असत. आताही जिल्ह्यातील काही भागात ही पारोग पद्धती अस्तित्वात आहे. पारोग म्हणजे दोन-तीन तासांचा शेतातील कामाचा अवधी होय. या पद्धतीत जो शेतकरी अधिक पैसे देणार त्याकडे महिला रोवणीसाठी जाण्यास पसंती दर्शवितात. आधीच्या पारोग पद्धतीत शेतात रोवणीची कामे ११ वाजताच्या सुमारास सुरू व्हायची. परंतु सध्या धान लागवडीचे क्षेत्र वाढल्यामुळे महिला सूर्योदयाच्या आधी ६ वाजताच्या सुमारास रोवणीला निघून जातात. सकाळी ६ वाजता पासून सुरू झालेले रोवणीचे काम शेतकरी ८.३० वाजता पर्यंत चालते. या एवढ्या दोन ते अडीच तासांचे निलज बुज व करडी परिसरात महिलांना ६० ते ६५ रुपये रोजी दिली जाते. नंतर महिला घरी जाऊन घरातील कामे आटपून स्वतःची शिदोरी बांधून परत ११ वाजताच्या सुमारास शेतात जातात व सायंकाळी ५.३० पयंत काम करतात. वेळेचे त्यांना सध्यातरी १३० ते १७० रुपयांपर्यंत रोजी दिली जाते.
दीड रुपया ते दीडशे रुपये रोजीचा प्रवास... - वाढती महागाई, भाताच्या लागवडीचे वाढलेले क्षेत्र व शेतीतील वाढत असलेले उत्पन्न हे सर्व बघता मागील ५ दशकांच्या कालावधीत परिसरातील महिलांची रोजंदारी शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पटीने वाढली आहे. १९७० च्या सुमारास गावात दुपारच्या रोवणीसाठी दीड रुपया रोजी होती, सद्यस्थितीत या रोजंदारी १३० ते १७० रुपयांपर्यंत येऊन ठेपली आहे.