७४.६९ टक्के निकाल : भंडाऱ्याच्या मुली हुशारचंभंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता दहावीचा निकाल आॅनलाईनद्वारे घोषित केला. भंडारा जिल्ह्याचा निकाल ७४.६९ टक्के लागला असून नागपूर विभागात भंडारा जिल्हा हा शेवटच्या स्थानावर आहे. यावर्षीही मुलींनी बाजी मारली असून उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत मुलांच्या तुलनेत मुलींची टक्केवारी अधिक आहे. भंडारा येथील नूतन कन्या विद्यालयाची क्षितीजा नरेंद्र राजाभोज ही विद्यार्थिनी जिल्ह्यातून पहिली आली आहे. तिला ९७.६० टक्के गुण मिळाले आहेत. जेसीस काँन्व्हेंटची साक्षी शोभराम गभणे आणि लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयाची जान्हवी मनोहर कारेमोरे या विद्यार्थिनी ९६.६० टक्के गुण द्वितीय तर महिला समाज विद्यालयाचा विद्यार्थी राज रोशन कटकवार तिसरा आला असून त्याला ९६.४० टक्के गुण मिळाले आहेत.एकूण निकालयावर्षी जिल्ह्यातील २८१ शाळांमधून १९ हजार ७१९ विद्यार्थ्यांनी आवेदन अर्ज भरले होते. त्यापैकी १९ हजार ६४७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १४ हजार ६७५ विद्यार्थी ऊतीर्ण झाले. ऊतीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ७,७४९ मुलींचा तर ६,९२६ मुलांचा समावेश आहे. मुलींची टक्केवारी ७८.४५ इतकी तर मुलांची टक्केवारी ७०.९० इतकी आहे. यात १,६३१ विद्यार्थी प्राविण्यप्राप्त ठरले. ४,१७९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६,३२० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २,५३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.भंडारा तालुका आघाडीवर भंडारा जिल्ह्याचा निकाल ७४.६९ टक्के लागला असून जिल्ह्यातील सातही तालुक्यातून भंडारा तालुका उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत आघाडीवर आहे. मोहाडी तालुक्याचा निकाल मागे आहे. यात भंडारा ८२.१३, लाखांदूर ७४.४२, लाखनी ७९.०६, पवनी ७६.८४, साकोली ७४.६५ तर तुमसर तालुक्याची टक्केवारी ६८.०५ इतकी आहे. सातही तालुक्यातून उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ७०.९० असून मुलींची टक्केवारी ७४.६९ आहे. १०० टक्के निकालाच्या १३ शाळायावर्षी दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील १३ शाळांनी निकालाच्या टक्केवारीत शंभरी गाठली आहे. यात भंडारा व तुमसर तालुक्यातून प्रत्येकी ५, साकोली, पवनी व लाखनी तालुक्यातून प्रत्येकी एक शाळेचा समावेश असून मोहाडी व लाखांदूर तालुक्यातून शंभर टक्के निकालाची एकही शाळा नाही. (शहर प्रतिनिधी)टॉपरला जायचयं प्रशासकीय सेवेतप्रचंड इच्छाशक्तीसमोर कुठलेही आव्हान सहज पेलता येते, असा दांडगा आत्मविश्वास आज क्षीतिजा राजाभोज या इयत्ता दहावीतील जिल्ह्यात टॉपर आलेल्या मुलीने बोलून दाखविला. इयत्ता बारावीपर्यंत बरेच काही शिकायचे आहे. त्यानंतर प्रशासकीय सेवेत जाण्याचा माझा मानस असल्याचाही तिने सांगितले. नियमित सराव, शिक्षकांचे मार्गदर्शन, शिकवणी वर्गाचा सातत्यपणा व वेळ मिळेल तेव्हा अभ्यास हेच माझ्या यशाचे मुख्य गमक आहे. त्यातच आई वडीलांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी राहिला. क्षीतिजाचे वडील एका खासगी कंपनीत नोकरीला असून आई निलम राजाभोज या गृहिणी आहेत. क्षीतिजाची लहान बहिण राधिका ही या वर्षी दहावीत आहे. बालपणापासूनच शिक्षणाचे बाळकडू मिळालेल्या क्षीतिजाला आपण जिल्ह्यात टॉपर येऊ असे वाटले नव्हते. मात्र आज जेव्हा तिला सांगण्यात आले तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. आपण क्षीतिजाचे आईवडील आहोत असे सांगताना कुटुंब गहिवरून गेले.
क्षितीजीने गाठले ‘क्षितीज’
By admin | Updated: June 18, 2014 00:02 IST