तुमसर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग वाढला आहे; परंतु लहान मुलांकरिता स्वतंत्र रुग्णालयाची सोय कुठेच नाही. त्यामुळे बालरोग तज्ज्ञ डॉ. अजय अग्रवाल यांनी जिल्हा प्रशासनाकडे रुग्णालय सुरू करण्याची परवानगी मागितली होती. जिल्हा प्रशासनाने त्यांना नुकतीच चिमुकल्यांकरिता कोरोनावर उपचार करण्याकरिता रुग्णालय सुरू करण्याची परवानगी दिली. जिल्ह्यातील बालकांना भरती करणारे पाहिले रुग्णालय ठरले आहे.
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. मोठ्यांकरिता शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा उपचार केला जातो; परंतु लहान मुलांकरिता स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू झाले नाही. बालरोगतज्ज्ञच बालकावर बाह्य उपचार करीत होते; परंतु त्यांना भरती करण्याकरिता अडचणींचा सामना करावा लागत होता. पालकांच्या जीवही वेशीला टांगला होता. लहान मुलांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर कुठे भरती करावे, असा प्रश्न पालकांना पडला होता. अनेक बालके गृह विलगीकरणात नाईलाजाने राहत होती. अधिक संसर्ग झाल्यानंतर त्यांना नागपूरशिवाय पर्याय नव्हता. यामध्ये पालकांची मोठी फरपट होऊन पालकांची चिंता वाढली होती.
तुमसर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अजय अग्रवाल यांनी जिल्हा प्रशासनाला कोरोनाग्रस्त बालकांना भरती करण्याची परवानगी मागितली होती. नुकतीच त्यांना जिल्हा प्रशासनाने दहा बेडची परवानगी दिली आहे. यामध्ये 0 ते १२ वर्षे वयाच्या बालकावर इलाज करण्यात येत आहे. सध्या रुग्णालयामध्ये एका बालकावर उपचार सुरू आहे.