तिरखुरी येथील घटना : घरगुती वादातून घडला प्रसंगपालांदूर : घर खर्च चालविण्यासाठी मदत होत नसल्याने वडील व मुलात वाद झाला. वाद वाढल्याने संतप्त वडिलाने मुलावर कुऱ्हाडीने वार करुन ठार केले. ही घटना लाखनी तालुक्यातील तिरखुर येथे रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.सतीश सुरेश चाचेरे (२५) असे मृतकाचे नाव आहे. तर सुरेश डुकरु चाचेरे (५५) असे आरोपी पित्याचे नाव आहे. मृतकाची बहिणीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन गावात शनिवारला मंडईचा कार्यक्रम असल्याने ती आपल्या पतीसह माहेरी आली होती. दरम्यान रात्री ८ वाजताच्या सुमारास वडील व मुलामध्ये कामधंदा व घर खर्चासाठी पैसे देण्याच्या वादावरुन भांडण झाले. वाद विकोपाला गेल्याने मोठी मुलगी राखी शहारे हिने मध्यस्थी केली. आज सकाळी नित्यनेमाने बापलेक उठून गावातील पानठेल्यावर गेले. दरम्यान तेथून परतल्यावर दोघांमध्ये पुन्हा त्याच मुद्यावरुन वाद सुरु झाला. यात संतप्त वडीलाने सुरेशला काठीने मारहाण केली. भावाला वाचविण्यासाठी बहिणीने वडिलाच्या हातातील काठी हिसकाविली. मात्र रागाच्या भरात असलेल्या वडीलाने घरातील कुऱ्हाड आणून सतीशवर अचानक सपासप वार केले. यात तो रक्ताच्या थारोड्यात पडला. बेशुध्द अवस्थेत त्याला बहिण व मेहुण्याने गावातील पोलीस पाटलाच्या मदतीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अस्थवस्थ असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पालांदूर पोलिसांनी आरोपी वडील सुरेश चाचेरे विरुध्द कलम ३०२ अन्वये गुन्हा नोदंवून अटक केली. घटनेचा अधिक तपास ठाणेदार सय्यद यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी गणपत कोल्हे, पियुष बाच्छल करीत आहेत. (वार्ताहर)
जन्मदात्याने केली मुलाची हत्या
By admin | Updated: December 14, 2015 00:31 IST