जनजागृती गरजेची : राष्ट्रध्वजाच्या सन्मानजनक वापराबाबत सूचना अंमलबजावणी आवश्यक भंडारा : राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हे बोधचिन्हे व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, १९५० व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७२ तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनिय अपराध आहे. मात्र दरवर्षी २६ जानेवारी, १५ आॅगस्ट, १ मे हे समारंभ साजरे करताना विविध शासकीय, निमशासकीय तसेच खासगी संस्थामार्फत ध्वजारोहण करण्यात येते. राष्ट्रध्वजाविषयी असलेले प्रेम, निष्ठा, अभिमान दर्शविण्याकरिता जनतेमार्फत व वैयक्तीकरित्या छोटया कागदी व प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. शालेय विदयार्थी व लहान मुले यांच्यासह अनेक व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी हे राष्ट्रध्वज विकत घेतात. हे ध्वज त्याचदिवशी सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी इतस्त: रस्त्यावर टाकले जातात. हा राष्ट्रध्वजाचा अवमान आहे.हे सुध्दा राष्ट्रध्वजाच्या प्रेमापोटी राष्ट्रध्वज विकत घेणाऱ्यांना समजत नाही. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या १.२ ते १.५ मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अशा आहेत.१.२ भारतीय राष्ट्रध्वज हा हातमाग, सुती कापड, लोकरी, सिल्क किंवा खादीचे असावे. १.३ राष्ट्रध्वज हा आयाताकार असावा. लांबी आणि उंची यांचे प्रमाण ३:२ असावे. १.४ ध्वज संहितेमध्ये राष्ट्रध्वजाचे ९ प्रमाणित आकार दिले आहेत ते असे आहेत. ६३० बाय ४२० सें.मी., ३६० बाय २४० सें.मी., २२७ बाय १८० सें.मी., १८० बाय १२० से.मी., १३५ बाय ९० सें.मी., ९० बाय ६० से.मी., ४५ बाय ३० सें.मी., २२.५ बाय १५ सें.मी., १५ बाय १० से.मी. असे नऊ प्रकार दिले आहेत. १.५ अतिमहत्वांच्या व्यक्तींच्या विमानावर ४५ बाय ३० से.मी आकाराचा राष्ट्रध्वज तर कारवर लावण्यासाठी २२.५ १५ सें.मी आणि टेबलवर ठेवण्यासाठी १५ १० सें.मी आकाराचे राष्ट्रध्वज वापरण्याचे सूचना ध्वजसंहितेमध्ये दिल्या आहेत. भारतीय ध्वजसंहितेच्या कलम २.२ एक्स व २.२ एक्स मध्ये खराब झालेल्या माती लागलेल्या राष्ट्रध्वजाची कशा प्रकारे विल्हेवाट लावावी याबाबतची तरतूद नमूद केलेली आहे. ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतूदीनुसारच राष्ट्रध्वजाचा वापर करणे तसेच त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे उच्च न्यायालयामध्ये २०११ मध्ये हिंदू जनजागृती समिती यांनी महाराष्ट्र शासन आणि इतर यांच्याविरुध्द जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करतांना मुंबई उच्च न्यायालायाने २९ सप्टेंबर रोजी राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत निर्देश दिले आहेत. ते असे करा सन्मान १. कोणीही प्लास्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. २. कागदापासून तयार केलेला ध्वज जनतेला महत्वपूर्ण अशा राष्ट्रीय, सांस्कृतिक व क्रिडा विषयक कार्यक्रमाच्या वेळी लावता येईल.३. सर्व जिल्हाधिकारी यांनी प्लॉस्टीक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करावी. ४. दरवर्षी २६ जानेवारी ,१५ आॅगस्ट, १ मे, इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडुन राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात , रत्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात. हे राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपुर्द करण्याचे अधिकार अशासकिय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी सदर राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपूर्द करावेत.५. अशासकिय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केलेल्या राष्ट्रध्वजांची जिल्हाधिकारी व तहसिलदार यांनी विल्हेवाट लावावी . 'खराब झालेले , माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधुन शिवुन बंद करावे. अशा प्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सुर्यास्तानंतर व सुर्योदयापुर्वी जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वच्छ जागेत सन्मानपुर्वक जाळुन नष्ट करावेत. हे करतांना उपस्थित सर्वांनी उभे रहावे व ते पुर्णपणे जळुन नष्ट होईपर्यंत ती जागा सोडु नये.
राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखा
By admin | Updated: August 15, 2015 01:09 IST