रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह : निवळ खड्डे बुजविण्यासाठी होणार लाखोंचा खर्चकरडी (पालोरा) : करचखेडा खमारी ते खडकी रस्ता खड्यात गेला आहे. रस्त्यावरून वाहन चालविताना अपघाताची भीती नेहमी असते. अनेकदा रस्त्यावर मोठे अपघात झाले. वाहनांचे नुकसानीसह जीवहानीही झाली. मात्र सा.बां. उपविभाग भंडारा यांना जाग आलेली दिसत नाही. उपविभागीय अधिकारी पी.पी. ठमके म्हणतात, खड्डे बुजविण्याचे टेंडर निघाले आहेत. परंतु फक्त खड्डे बुजवून उपयोग काय? रस्त्यावर कारपेट केव्हा होणार, असे प्रश्न विचारले जात आहे. राज्य सा.बां. उपविभाग भंडारा यांच्या कार्यक्षेत्रात भिलेवाडा ते खडकी रस्ता मोडतो. खडकी ते कोका रस्ताही त्यांच्याच अधिकारात येतो. दोन्ही रस्त्याची अत्यंत अवदशा झाली आहे. त्यातही भयंकर वाईड स्थिती खडकी ते भिलेवाडा या जिल्ह्याच्या ठिकाणाला जोडणाऱ्या रस्त्याची झाली आहे. उन्हाळ्यात अनेकदा मलाई खाण्यासाठी संबंधित ठेकेदारांना विभागामार्फत दुरुस्तीची कामे देण्यात आली. परंतु रस्ते कधी दुरुस्त झाले नाही. महिन्याभरातच दुरुस्त झालेल्या खड्यासह इतर ठिकाणीही मोठे खोल खड्डे पडले. रस्त्यात खड्डा आहे की, खड्ड्यात रस्ता हेच समजायला मार्ग नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नाही, ना आमदार, खासदारांचे. सर्व काही आलबेल सुरु आहे. नागरिक मात्र खड्यात मरायला मोकळे सोडल्यासारखी अवस्था आहे. दोन वर्षाअगोदर ढिवरखेडा ते खडकी दरम्यानच्या रस्त्याचे मजबुतीकरणासह डांबरीकरण करण्यात आले. लाखो रुपये तीन कि.मी. रस्ता तयार करण्यासाठी जनतेचे पैसे खर्ची पडले. परंतु पैशाच्या हपालेल्या कंत्राटदार व त्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांनी अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता बांधला गेला. वर्षभरात सोडा, महिनाभरातच रस्ता उखडून तीन महिन्यात खोल खड्डे पडले. तक्रारी झाल्या. कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई झाल्याचे विभागामार्फत सांगितले गेले. मात्र त्या कंत्राटदाराला साथ देणारे अभियंते मात्र नामनिराळे राहिले. आज या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण कार्य झालेले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खडी उखडून पसरली आहे. रात्रीच्या अंधारात वाहन हेलकावे खातो. त्यामुळे केव्हा अपघात होईल याचा नेम राहत नाही. नुकतेच विभागाने या रस्त्यावरील खड्डयांच्या दुरुस्तीसाठी टेंडर काढले. फक्त खड्डे बुजविण्याने काय होणार आहे. रस्त्याची सालपटे निघाली आहेत. त्यावर तात्पुरता इलाज काय उपयोगी ठरणार. रस्त्याच्या पूर्णत: नवीनीकरणाची गरज आहे. रस्त्यावर खड्डे बुजविण्यासह कारपेट होणे गरजेचे आहे. अन्यथा आंधळा दळतो, अन् कुत्रे पीठ खाते, अशीच अवस्था बघायला मिळणार आहे, एवढे नक्की.(वार्ताहर)
करचखेडा-खडकी रस्ता धोकादायक
By admin | Updated: October 26, 2015 00:54 IST