तुमसर : तुमसर रोड-तिरोडी प्रवासी रेल्वे गाडीत कामठी व नागपूर येथील जुगार खेळणाऱ्या टोळ्यांचा हौदोस सुरू असून भोळ्याभाबळ्या प्रवाशांची सर्रास लुबाडणूक करीत आहेत. मागील १५ दिवसापासून हा प्रकार येथे सुरू आहे. रेल्वे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष येथे आहे.तुमसर रोड-तिरोडी प्रवासी रेल्वे गाडी दिवसातून चारदा ये-जा या मार्गावर करते. मध्यप्रदेशातील तिरोडी येथे जाण्याकरिता हा एकमेव रेल्वे मर्ग आहे. चिखला, डोंगरी व तिरोडी येथे भारत सरकारच्या खाणी आहेत. या मार्गावर कामगार, शेतकरी तथा मजूर वर्ग या प्रवाशी रेल्वे गाडीतून प्रवास करतो. स्वस्त तिकीट, जलद प्रवासामुळे प्रवासी गाड्या हाऊसफुल्ल असतात. कामठी व नागपूर येथील दोन ते तीन टोळ्या या रेल्वेगाडी प्रवास करतात. प्रवासादरम्यान प्रथम टोळीतील सदस्य जुगार खेळतात (तीनपत्ती) यात खेळणाऱ्यांना जिंकण्याची संधी नेमकी ते देतात. त्यांच्याच टोळीचे सदस्य असल्याने ते जाणीवपूर्वक असे करतात. प्रवास करणाऱ्यांना खेळण्यास ते बाध्य करतात. प्रथम प्रवासीसुद्धा चांगली रक्कम जिंकतो. नंतर तो आपल्याकडील पूर्ण रक्कम कशी हरेल तोपर्यंत हा खेळ खेळला जातो.१५ दिवसात या टोळीने अनेकांना गंडविले. काही प्रसंगी शाब्दिक चकमक प्रवाशांत झाली. या रेल्वेगाडीत तिकीट तपासणीत व रेल्वे पोलीस नाहीत. त्यामुळे ही टोळी येथे मुजोर झाली आहे. येथे मार्गावर अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशांच्या सुरक्षेकरिता या मार्गावर रेल्वे प्रशासनाने उपाययोजना केली नाही. तिरोडी-तुमसर-ईतवारीपर्यंत ही प्रवाशी रेल्वे गाडी दिवसातून एकदा जाते. या मार्गावर ही टोळी १५ ते २० च्या संख्येने प्रवास करीत असल्याने प्रवाशात भीतीचे वातावरण आहे. या टोळीकडे शस्त्रे असल्याचीही माहिती आहे. या मार्गावर रेल्वे चालकाशिवाय रेल्वेचा जबाबदार कर्मचारी व अधिकारी नाही. संपूर्ण प्रवासी गाडी रामभरोसेच धावत आहे. (तालुका प्रतिनिधी)
प्रवासी रेल्वेगाडी बनली जुगाराचा अड्डा
By admin | Updated: September 27, 2014 01:12 IST