साकोली : मतदानाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसा प्रचाराला रंग भरू लागला आहे. सकाळपासूनच उमेदवारांच्या कार्यालयात प्रचारसाहित्य घेवून कार्यकर्त्यांचे जत्थे मतदारसंघात प्रचारासाठी बाहेर पडू लागले आहेत. सकाळपासून दुपारपर्यंत प्रचार करायचा दुपारी एखाद्या विसाव्याचा ठिकाणी बसून जेवायचे आणि पुन्हा सायंकाळपर्यंत प्रचार करायचा, असा दिनक्रम सध्या सुरू आहे. दिवस अखेरीस उमेदवार या प्रभारी कार्यकर्त्यांना त्यांचा मेहनताना देत असल्याचे समजते.निवडणूक म्हटली की, कार्यकर्त्यांची गरज असते. कुठल्याही राजकीय पक्षात नेते मंडळीचे फोटो, प्लॅक्स बॅनरपुरतेच मर्यादित राहतात. मात्र पक्षाचा खरा चेहरा जनसामान्यात वावरणाऱ्या कार्यकर्त्यातून दिसतो याची आठवण नेमकी निवडणूक रणधुमाळीत उमेदवारांना झाली आहे. त्यामुळे आपल्या पक्षातील अथवा पक्षाबाहेरील संपर्क तुटलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेण्यासाठी विनवणी केली जात आहे.राजकीय सारीपाटावर पक्षाचा आजुबाजूने वजीरापासून उंटापर्यंतची भूमिका निभावत असतात. मात्र खऱ्या अर्थाने ज्याच्या जीवावर ही लढाई जिंकायची आहे त्यांच्याकडे आजतागायत दुर्लक्ष करण्यात आले. सर्वसामान्यांना कधीही न भेटणारी राजकीय नेते मंडळी मात्र आता भल्या सकाळीच मतदारांच्या दारी जावून दार ठोठावताना दिसून येत आहे. विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारासोबत कार्यकर्त्यांना घाम गाळावा लागत आहे.निवडणुकीचा मतदानाचा दिवस जवळ आला असून निवडणुकीचे वातावरण आता खऱ्या अर्थाने तापायला लागले आहे. एरव्ही आलीशान गाड्यांमधून फिरणारे नेते विविध राजकीय पक्षाचे नेते मेळावे प्रचार रॅली, विविध समाजाच्या मिरवणूका, धार्मिक उत्सव समारंभात सहभागी झालेले दिसून येतात. नेते मंडळी सर्वच ठिकाणी जात आहे. त्यामुळे निवडणूका का होईना नेते खऱ्या अर्थाने जमिनीवर आल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेले नेतेमंडळीची धावपळ सुरू झाली आहे. सकाळी सात वाजतापासून सुरू होणाऱ्या प्रचार फेऱ्या दुपारी २ वाजेपर्यंत चालतात. त्यानंतर दुपारच्यावेळी कार्यकर्त्यांच्या बैठकी आणि मेळावे घेवून पुन्हा सायंकाळी ५ नंतर प्रचार यात्रेला प्रारंभ करतात. सायंकाळी जाहीर सभा किंवा वार्डामधील नुक्कड सभा रात्री १० पर्यंत चालतात. आचारसंहितेमुळे सभा रॅली स्कुटर मिरवणूक पदयात्रा रात्री १० वाजताच्या आत संपवाव्या लागतात. त्यानंतर दुसऱ्या दिवसीचे नियोजन कार्यकर्त्यांची व्यवस्थाही करावी लागतेच. कुणी स्टार प्रचारक आला की त्यांच्या जाहीर सभांना उपस्थित राहत असतात. एरवी कधीही भेटावयास गेल्यास न भेटणारे नेते भल्या सकाळीच दारापुढे हात जोडून तयार असतात. मत मागण्यासाठी का होईना नेते दारापर्यंत येत आहेत. यातही समाधान मानणारे अनेक नागरिक दिसतात. (शहर प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांचे जत्थे मतदारसंघात
By admin | Updated: October 11, 2014 01:19 IST