मुख्याध्यापकांना बजावली नोटीस : पालक-मुख्याध्यापक-संस्था सचिवाचा वादलाखांदूर : जिल्हा परिषदेच्या इयत्ता १ ते ७ वर्ग असलेल्या डांभेविरली गावातील शाळेला वर्ग ८ वा जोडण्याहेतू मागील मार्च महिन्यात येथील ग्रामस्थ, पालक व शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला. प्रस्ताव नियमानुसार होता. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विषय समितीने संबंधित प्रस्ताव नाकारल्याने वर्ग ८ वी चा वाद पेटला आहे. गावातच एका खासगी संस्थेअंतर्गत मागील काही वर्षापासून वर्ग ८ ते १० विनाअनुदानीत तत्वावर शाळा सुरु असताना पालकांनी जिल्हा परिषद शाळेतच विद्यार्थ्यांना शिकविण्याचे ठरविताच खासगी शाळेच्या संस्था सचिवाने जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस बजावून वर्ग ८ वा उघडण्यास मज्जाव केला. या कारणाहून पालक, मुख्याध्यापक व संस्थासचिवांमध्ये वाद पेटला आहे. निवेदनानुसार लाखांदूर तालुक्यातील डांभेविरली गावात जि.प. ची वर्ग १ ते ७ ची शाळा असून बाळजाबाई बुरडे हायस्कुल नामक वर्ग ८ ते १० ची खासगी संस्थेअंतर्गत विनाअनुदानित शाळा सुरु आहे. जि.प. च्या वर्ग १ ते ७ च्या शाळेत या सर्व सोयी सुविधा व योजनेचा लाभ येथील विद्यार्थ्यांना होत असल्याने जि.प. शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांनी जि.प. शाळेला वर्ग ८ जोडण्याची मागणी शासन नियमाप्रमाणे केली होती. तसा प्रस्ताव देखील जि.प. च्या शिक्षण विषय समितीकडे सादर करण्यात आला होता. शिक्षण विभागाच्या नियमानुसार एप्रिल महिन्यात संबंधित प्रस्ताव जि.प. च्या शिक्षण विषय समितीपुढे मंजुरीसाठी ठेवणे बंधनकारक होते. तालुक्यातील जि.प. च्या १ ते ४ वर्ग असलेल्या शाळेला ५ वा वर्ग तर १ ते ७ च्या शाळेला ८ वा वर्ग जोडण्याबाबत लाखांदूर तालुक्यातून अनुक्रमे १३ व १२ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. मात्र सादर केलेल्या प्रस्तावांपैकी तालुक्यातील एकाही प्रस्तावाला समितीने मंज़ुरी दिली नसल्याची गोपनीय माहिती आहे. या घटनेची माहिती खासगी शाळेच्या संस्था सचिवाला होताच खासगी शाळेतील वर्ग ८ वा बंद पडू नये, यासाठी खासगी शाळेच्या संस्था सचिवाने चक्क जि.प. शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस बजावली. खासगी संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या वर्ग ८ ते १० च्या शाळेत शालेय विद्यार्थ्यांना भौतिक सोयी सुविधांसह शासन योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप आहे. दरम्यान शिक्षण विभागाच्या नियमानुसार जि.प. शाळेच्या वर्ग ७ मध्ये शिकणाऱ्या सुमारे ३३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी ग्रामपंचायत समिती व शाळा व्यवस्थापन समिती अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विषय समितीकडे मुदतपूर्व प्रस्ताव सादर करूनही संबंधित प्रस्ताव मंजुरी न मिळणे संशयास्पद ठरले आहे. पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रा.पं. समिती सदस्यांनी जि.प. शाळेला वर्ग ८ जोडण्याहेतू तात्काळ मंजूरी प्रदान करावी. अन्यथा येत्या ३० जुलै रोजी जि.प. शाळेला कुलूपबंद करून उपोषण आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)जि.प. प्राथमिक शाळेत नव्याने सुरु केलेले वर्ग ८ हे शिक्षण विभागाच्या परवानगीशिवाय सुरु केले आहे. तीन कि.मी. च्या आत समकक्ष वर्ग सुरु करण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश असताना मुख्याध्यापकाने वर्ग ८ सुरु केले. नियमाच्या आधारे नोटीस बजावली. न्यायालयात दाद मागण्यात आली आहे.-सदानंद बुरडे, संस्था सचिव
डांभेविरलीत पेटला इयत्ता ‘आठवी’चा वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2016 00:34 IST