चुल्हाड/सिहोरा : नियोजन आणि निधीअभावी शेतकर्यांनी स्थापन केलेला बपेरा व पिपरी (चुन्ही) येथील महत्त्वाकांक्षी जय किसान जलसिंचन प्रकल्प भंगारात निघाला आहे. वैनगंगा नदीपात्रात पाण्याची साठवणूक करण्यात आल्याने हा प्रकल्प पुन्हा सुरु करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. सिहोरा परिसरात शेतीला सिंचित करणारा विस्तीर्ण चांदपूर जलाशय आहे. या जलाशयाचे पाणी टेलवर असलेल्या शेतीला पोहोचत नाही. ही समस्या आणि अडचण गेल्या अनेक वर्षापासून आहे. यामुळे टेलवर असलेली शेती जलाशयाच्या पाण्याने ओलिताखाली आणताना यंत्रणेला कसरत करावी लागते. खरीप हंगामात पाण्याची समस्या राहत नाही. परंतु, रबी हंगामात जलाशयाचे पाणी प्राप्त होणार किंवा नाही याची कल्पना शेतकरी करीत नाही. टेलवर असलेल्या शेतकर्यांना सुजलाम्-सुफलाम् करताना अडचणीचा सामना करावा लागतो. हे यंत्रणाही नाकारत नाही. परंतु पाणी पोहोचविण्याचा पर्याय नाही. ही गेल्या अनेक वर्षांपासून समस्या असताना प्रश्न निकाली निघणार नाही. म्हणून बपेरा आणि पिपरी चुन्ही गावातील काही वर्षापूर्वी शेतकर्यांनी संयुक्त गट तयार केला. गावात सहकारी संस्था स्थापन केली. जय किसान जल सिंचन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. शासन आणि शासकीय निधी प्राप्त करण्याचा यात संबंध नव्हता. या प्रकल्पाचे चालक आणि मालक हे शेतकरी होते. प्रकल्प उभारण्यासाठी शेतकर्यांनी गुंतवणूक केली. बपेराच्या प्रकल्पाला देवसर्रा, बपेरा, सुकळी (नकुल), गोंडीटोला ही गावे जोडण्यात आली. बपेरा गावानजीक वैनगंगा नदीवर शेतकर्यांच्या गुंतवणुकीतून प्रकल्प तयार करण्यात आला. या प्रकल्पाचे कालवे तयार करण्यात आले. या प्रकल्पाच्या पाण्याने शेतकरी समाधानी होते. टेलवर प्रकल्पाने उपसा करण्यात आलेले पाणी पोहोचत होते. परंतु मध्यंतरी या प्रकल्पाला अखेरची घरघर लागली. लाखोचे वीज बिल थकल्याने प्रकल्प बंद करण्यात आला आहे. शेतकर्यांचा संयुक्त गट सैरावैरा झालेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प बंद आहेत. शेतकर्यांनी स्थापन केलेला प्रकल्प भांगारात निघाला आहे. प्रकल्प उभा असला तरी साहित्य चोरीला गेली आहेत. प्रकल्प आणि कालवे आजही शाबूत आहेत. वीज जोडणी उभी आहे. प्रकल्पस्थळात सर्वकाही जसेच्या तसे आहे. प्रकल्प पुन्हा सुरु करण्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. दरम्यान, हे प्रकल्प बंद झाले असता पाटबंधारे विभागाने संलग्नित शेतीला चांदपूर जलाशयाला सिंचनासाठी जोडली आहेत. शेतकर्यांचे करारनामे केली आहे. परंतु आजही टेलवर पाणी पोहोचत नाही, अशी समस्या आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी नियोजनाची गरज आहे. कवलेवाडा, मांडवी गावानजीक धरण बांधकामात पाणी अडविण्यात आल्याने नदी पात्रात पाणी आहे. विजेची समस्या निकाली काढून यंत्राची दुरुस्ती करण्याची गरज आहे. शासनाने हे दोन्ही प्रकल्प ताब्यात घेऊन विकसित करण्यासाठी पुढाकार घेण्याची प्रतिक्रिया शेतकरी देत आहे. राज्य शासनाने या प्रकल्पाला पुनर्जीवित केल्यास रबी हंगामात पाणी वाटप करताना रोटेशन पद्धतीला तिलांजली मिळेल. संपूर्ण परिसरात शेतकर्यांच्या शेतीला पाणी वाटप करण्यासाठी दोन्ही प्रकल्प रामबाण ठरणार आहेत. अशा शेतकर्यांच्या प्रतिक्रिया आहेत. (वार्ताहर)
जलसिंचन प्रकल्प भंगारात
By admin | Updated: May 18, 2014 23:22 IST