मोहन भोयर ल्ल तुमसर वेळेच्या आत वीज देयक देण्याचा शिरस्ता महावितरण कंपनीत असल्याचा दावा करण्यात येतो, परंतु मागील काही महिन्यापासून महावितरणच्या वीज देयक वितरणात अनियमितता दिसून येत आहे. वीज ग्राहकांवर यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे. संगणकीय युगात महावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.वीज आज प्रत्येकाची गरज झाली आहे. नवीन नियमानुसार सर्वसामान्य वीज ग्राहक दर महिन्याला आलेले देयक जबाबदारीने भरण्याचा प्रयत्न करतो, परंतु वीज ग्राहकाच्या हातात वेळेच्या आत वीज देयक मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हाभरातून आहेत. हा क्रम मागील अनेक महिन्यापासून सुरु आहे. परंतु त्याच्यावर महावितरणने अजूनपर्यंत तोडगा काढला नाही.जिल्हास्तरावर महावितरणने एक मुख्य वीज वितरकाची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून तालुक्याच्या स्थळी वीज देयके संबंधित कार्यालयात पाठविण्यात येतात. नंतर तालुक्यातील वितरक घरोघरी जाऊन वीज देयके वितरीत करतात. सध्या प्रत्येक महिन्याला वीज बिल येत आहे. यापूर्वी तीन महिने, नंतर दोन महिने व एका महिन्याचे वीज देयके महावितरण देत आहे.मिटर रिडींग घेणे, ती कार्यालयाकडे पाठविणे, कार्यालयीन कामे पार पडल्यानंतर प्रिंटींग करणे, नंतर जिल्हास्तरावरून ते वितरीत करणे याकरिता बराच अवधी लागतो. यामुळे वीज ग्राहकांना वेळेवर वीज देयक मिळत नाही. दिलेल्या तारखेनंतर वीज देयक भरल्यास ग्राहकाला फाईन भरावे लागते. त्याचा आर्थिक भुर्दंड वीज ग्राहकांना सहन करावा लागतो. ग्राहकाला वेळेत वीज देयक देण्याची काळजी येथे घेतली जात नाही असे दिसते.तुमसर शहर, देव्हाडी परिसर, सिहोरा तथा नाकाडोंगरी परिसरात नित्यनियमनाने उशिरा वीज देयके देण्यात येत आहेत. तुमसर शहराकरिता किमान तीन ते चार वितरक नियुक्त करण्याची गरज आहे. महावितरण येथे गंभीर दिसत नाही.कृषी वीज पंपधारक ग्राहकांना सरासरी वीज देयके पाठविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मिटर रिडींग घेतली जात नाही. शेतकऱ्यांचे घर सहसा वीज बिल वितरकांना माहिती होत नाही. याचा फटकाही कृषी पंपधारक शेतकऱ्यांना बसतो. तीन एचपी तथा पाच एचपी कृषी पंपधारकांना सारखेच वीज देयक देणे सुरु असल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी मुळ वीज वितरण कंपनीचे कर्मचारी कामे करीत नाहीत. तर त्यांची कामे भाडे तत्वावर दुसरेच करीत असल्याचे समजते. वीज चोरी रोखण्याकरिता महावितरणने भरारी पथकाची नेमणूक केली आहे. ही अभिनंदनाची बाब आहे. परंतु मूलभूत समस्या कायमस्वरुपी केव्हा दूर होणार असा प्रश्न हजारो वीज ग्राहकांना पडला आहे. संगणकीय युगात समस्या दूर होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते.तुमसर शहर तथा ग्रामीण परिसरात वीज देयके ग्राहकांना वेळेवर मिळत नाही. याबाबत जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.- नंदलाल गडपायलेउपविभागीय अभियंतामहावितरण, तुमसर.
अनियमित देयक वाटपाचा ग्राहकांना फटका
By admin | Updated: November 6, 2015 02:04 IST