तुमसर : राज्याच्या सीमावर्ती गावातील ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीला तुमसर पोलिसांनी मुद्देमालासह २४ तासात तपासाची चक्रे फिरवून गजाआड केले. ट्रॅक्टरच्या चाकावरून पोलिसांनी शोध केला. आंतरराज्यीय टोळीचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील जंगलव्याप्त गाव मोहबर्रा येथून तीन आरोपी रविशंकर अशोक डोंगरे (२१), नवनीत उर्फ नानू गोविंदा बोपचे (१८), कौशलनाथ गणेशनाथ पटले (१९) यांना ट्रॅक्टरसह तुमसर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. आरोपीवर भादंवी ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.डोंगरला येथील चंद्रशेखर दिवाकर भुते यांच्या मालकीचा ट्रॅक्टर घरासमोर स्वराज्य कंपनीचा क्रमांक एम.एच. ३६ एल ४३२३ ठेवला होता. गुरुवारच्या मध्यरात्री ट्रॅक्टर टोळीने लंपास केला. सकाळी भुते यांना ट्रॅक्टर चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यांनी तुमसर पोलिसात तक्रार नोंदविली. तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. सिवनी जिल्ह्यातील मोहबर्रा या जंगलव्याप्त गावात तुमसर पोलिसांचे पथक पोहचले. तत्पूर्वी मध्यप्रदेशातील स्थानिक पोलिसांनी या पथकाला मदत केली नाही. आरोपी रविशंकर डोंगरे याला ताब्यात घेतल्यावर त्याने अन्य दोन साथीदारांची नावे सांगितली. चाकाच्या चिन्हावरून ट्रॅक्टरचा शोध लागला. मध्यप्रदेशाच्या सीमा तुमसर तालुक्याला भिडल्या आहेत. परिसरातील ट्रॅक्टर व मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत. येथे आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर गवई यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार धर्मेंद्र बोरकर, पोलीस नायक सहारे, लिल्हारे, पटोले यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)
ट्रॅक्टर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड
By admin | Updated: August 23, 2014 23:48 IST