शहापूर : स्थानिक मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना शाखेद्वारे आंतरराष्ट्रीय युवा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनातर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांसाठी ‘सोशल मीडियाचा आजच्या विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, तर ‘आजचा युवक काय हरवून बसला आहे’ या विषयावर पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. याशिवाय ‘एक मिनिट गेम शो’ स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कोरोना निर्बंधाचे पालन करून उत्साहात विविध स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभाग नोंदविला. वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये रिया खन्ना हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. ललित हनवटकर यांनी द्वितीय, तर अमन बनसोड याने तृतीय क्रमांक पटकावला. वन मिनिट गेम शोमध्ये ललित हनवटकर विजेता ठरला. पोस्टर स्पर्धेमध्ये मृणाली कृपान हिने प्रथम, तर आर्या मरजीवे हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष नशिने, प्रा. डॉ. प्रल्हाद हरडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. शाहिद अख्तर शेख यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाविद्यालयीन अधिकारी, कर्मचारी तसेच रासेयोच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:41 IST