३० लोक ०६ के
पवनी : जिल्ह्यात आतापर्यंतच्या मोटारसायकल चोरणे व विक्री करणे या घटनांतील सर्वात मोठे प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात एलसीबीच्या पथकाला यश आले आहे. ४१ मोटारसायकलसह आंतरजिल्हा चोरी करीत असलेल्या दोन दुचाकी चोरट्यांना गजाआड करण्यात आले आहे. प्रमोद अंबादास रंगारी (४५) रा. भोजपूर ता. पवनी व त्याचा साथीदार दीपक दत्तू व्यास(४५) रा. तामसवाडी ता. पारशिवनी जि. नागपूर असे पकडण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
पवनी तालुक्यातील आसगाव येथून मोटारसायकल चोरीला गेली. त्या मोटारसायकल चा शोध घेत असताना मोटारसायकल चोरी करुन विक्री करणारे एक मोठे रॅकेट शोधून काढण्यात गुन्हे शाखेला यश मिळाले. भंडारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरात मोटारसायकल चोरीच्या होणाऱ्या घटनांची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी व्यूहरचना आखून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना तातडीने मोटारसायकल चोरीच्या घटनांचा उलगडा करण्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, पोलीस उपायुक्त निरीक्षक रविंद्र रेवतकर, पो.हवा.रवी बोरकर, विजय राऊत, नितीन शिवणकर, पोलीस नायक कैलाश पटोले, प्रशांत कुरंजेकर, पोलीस शिपाई संदीप भानारकर, सचिन देशमुख यांचे पथक तातडीने रवाना झाले. तीन जिल्ह्याची सीमा लागणाऱ्या पोलीस स्टेशन पवनी लगतच्या परिसरात रवाना होऊन गोपनीयता बाळगून माहिती काढली असता पवनी ग्रामीण परिसरात जास्तीत जास्त नागपूर शहर, नागपूर ग्रामीण नोंदणीकृत कंपनी च्या मोटारसायकल वापरात असून एक इसम या नोंदणीकृत मोटारसायकल ग्रामीण लोकांना भूलथापा देऊन कमीतकमी किमतीत विक्री करीत असल्याचे माहिती गुन्हे शाखेला मिळाली. यावरुन प्रमोद रंगारी यास ताब्यात घेतले. त्याने त्याचा साथीदार दीपक व्यास याचे सोबतीने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून मोटारसायकल चोरी केल्या व पवनी तालुक्यातील ग्रामीण परिसरात कमीतकमी किमतीत विक्री केल्याचे सांगितले. यावरून दोघांनाही अटक करण्यात आली. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, पवनी चे पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र रेवतकर, पोलीस हवालदार रवी बोरकर, विजय राऊत, नितीन शिवणकर, कैलास पटोले, किशोर मेश्राम, प्रशांत कुरंजेकर, राजु दोनोडे, संदीप भानारकर, सचिन देशमुख, पो. हवा. सत्यमेव हेमने , सुरेश रामटेके यांनी यशस्वीरीत्या कामगिरी पार पाडली, अशी माहिती पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण व जगदीश गायकवाड यांनी पवनी येथे पत्रकार परिषदेत दिली .
बॉक्स
पवनी परिसरातील ग्रामीण भागातून १२ लक्ष ४० हजार किमतीच्या तब्बल ४१ मोटारसायकल मुद्देमालासह जप्त करण्यात आलेला आहे. दोन्ही आरोपी पवनी ठाणे येथील कोठडीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखा भंडारा चे पथक मोटारसायकलींच्या अन्य चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.