जनतेच्या सहकार्याची गरज : ठोणदारांनी केले ग्रामस्थांना मार्गदर्शनपालांदूर : दैनंदिन जीवनात शांतता टिकवून ठेवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. पोलीस जनतेचे मित्र असुन संबंध टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण होणे गरजेचे आहे. याची जाणीव सर्वसामान्यांना व्हावे यासाठी पालांदूर येथे पोलीस मित्र रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.गावातील प्रमुख मार्गाने ही रॅली काढण्यात आली. यानंतर बसस्थानक परिसरात घेतलेल्या कार्यक्रमात ठाणेदार ए.एस. सय्यद यांनी मार्गदर्शन करताना, लोकशाहीप्रधान देशात कायदा व सुव्यवस्था टिकविणे जनतेचे प्रथम कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले. या रॅलीत २०० पोलीस मित्रांचा समावेश होता. यात ५४ गावातील पोलीस मित्र ज्यात स्त्री, पुरुष यांचा उत्साहपूर्वक सहभाग होता. पोलीस ठाणे ते बाजार चौक या मुख्य रस्त्याने पायी रॅली काढण्यात आली. बाजारचौकात हजारो लोकांच्या साक्षीने रॅलीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. पालांदूर पोलीस ठाण्याच्या इतिहासात प्रथमच पोलीस रॅली काढून पोलीस आमजनतेचे सेवक तर आहेतच; परंतु चांगले मित्रसुध्दा असल्याचे रॅलीतून नागरिकांना संदेश दिला.रॅलीकरिता ठाणेदार सय्यद, पोलीस पाटील सुनील लुटे, मोरेश्वर प्रधान, सरपंच वैशाली खंडाईत, पोलीस हवालदार कोल्हे, पोलीस शिपाई अतुल मेश्राम, पीयूष कच्छवाह, प्रतीक बोरकर, गजानन नेमाडे आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)
पालांदुरात पोलीस मित्रांची रॅलीतून प्रबोधन
By admin | Updated: December 14, 2015 00:41 IST