भंडारा : नागपूर विभागात यशवंत पंचायतराजचा प्रथम पुरस्कार पटकाविलेल्या भंडारा पंचायत समितीचे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामनिर्देशन झाले आहे. या अनुषंगाने यशवंत पंचायत राज समितीच्या सहा सदस्यीय समितीने भंडारा पंचायत समितीला भेट घेऊन विविध कामांचा आढावा घेतला. जालनाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोतरे व हिंगोलीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नितीन दाताळ यांच्या नेतृत्वात सहा सदस्यीय चमूने भंडारा पंचायत समितीचा दौरा केला. यावेळी त्यांनी भंडारा पंचायत समितीची पाहणी केली. यात यशवंत पंचायत राज अधिनियम उपक्रम, पंचायत समितीचे कामकाज, अभिलेख वर्गीकरण, योजनांची माहिती, कार्यालयीन प्रशासन, आरोग्य, कृषी, महाराष्ट्र रोजगार हमी योजना, समाजकल्याण जीवनोन्नती अभियान, स्वच्छ भारत मिशन यासह अन्य विभागांची प्रत्यक्ष पाहणी करून कागदपत्रांची माहिती जाणून घेतली. समितीने सर्व विभागप्रमुखांकडून अधिनियमनानुसार माहिती जाणून घेतली. अभिलेख वर्गीकरण कक्षासह कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था, बायोमेट्रीक मशीनची तपासणी, विभागनिहाय कर्मचाऱ्यांचे कामकाज, कार्यालय स्वच्छता व परिसरातील स्वच्छतेची पाहणी, पंचायत समितीत येणाऱ्या नागरिकांसाठीचे माहिती फलक, बगिचा, पिण्याचे पाणी व अभ्यागत कक्ष व बैठक व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. यावेळी कमी क्षेत्रफळाच्या जागेतील पंचायत समिती प्रशासनाने उत्कृष्ट व्यवस्था केल्याचे बघून समितीने समाधान व्यक्त केले. यावेळी पंचायत समितीचे संवर्ग अधिकारी मंजुषा ठवकर, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी जगन्नाथ भोर, सभापती प्रल्हाद भुरे, उपसभापती ललीत बोंद्रे, विस्तार अधिकारी प्रमोद हुमणे, पंचायत समितीचे सदस्य, विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मंजुषा ठवकर यांनी समिती सदस्यांना पंचायत समितीमधील सुविधांची माहिती दिली. (शहर प्रतिनिधी)वॉटर प्लांटचे केले उद्घाटनपंचायत समिती प्रशासनाने येथे येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्लांट सुरु केला आहे. अल्प पैशात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्लांटचे उद्घाटन यशवंत पंचायत राज समितीचे प्रमुख धोतरे यांच्या हस्ते करून त्याचे लोकार्पण करण्यात आले. यासोबतच पंचायत समितीने लावलेली रेन वॉटर हार्वेस्टरची पाहणी करण्यात आली.
यशवंत पंचायतराज समितीकडून भंडारा पंचायत समितीची पाहणी
By admin | Updated: March 1, 2017 00:29 IST