पवनी : तालुक्यातील कोरंभी येथे रांगोळी, समृक्षी, संजीवनी, प्राप्ती, रमाई यांच्या संयुक्त विद्यमाने गोसे धरणमध्ये केज कल्चर पिंजऱ्यातील मासे पालन प्रकल्प उभारला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा एमआरसीपी योजने अंतर्गत महिलांचे बचत गट तयार करण्यात आले होते. सदर गट नवीदिशा लोकसंचालित साधन केंद्र सीएमआरसी पवनी येथे जोडण्यात आले. नाबार्डच्या योजने अंतर्गत त्याचे वैनगंगा उत्पादन गटात रूपांतर करण्यात आले.भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, आत्मा प्रकल्प भंडाराच्या प्रज्ञा भगत, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी अरविंद खापर्डे यांनी सदर उत्पादक गटाला केज कल्चर प्रकल्पासाठी प्रोत्साहित केले. या कामासाठी २५ महिला तयार झाल्या. या प्रकल्पासाठी प्रती युनिट अडीच लाखांची गरज होती. अर्थ सहाय्य मिळण्यासाठी नाबार्डच्या योजनेतून प्रत्येकी पाच सदस्यांचे पाच जेएलजी तयार करण्याचा अरविंद खापर्डे यांनी सल्ला दिला. सीईओ राहूल द्विवेदी यांचे प्रयत्नाने , आत्मा प्रकल्प भंडारा, माविम भंडारा यांचे मार्फत अर्थसहाय्य मिळवून देण्यात आले. प्रत्येक पिंजरा १५ बाय १० बाय १० फूटाचा असून त्यामध्ये तेलापी जातीचे प्रत्येकी वीस हजार किंमतीचे चार हजार बोटुकली सोडण्यात आली. सकाळी व संध्याकाळी खाद्य टाकण्याचे काम महिला त्यांचे कुंटुंबासोबत डोंग्याने जावून करतात. त्यावेळी राहुल द्विवेदी, माहिमंच्या निंबोरकर, देशमुख, जेएलजी प्रमुख माधुरी येळणे, रजनी सेरकुरे, चंदा आंबेडारे, ललीता शेरकुरे, येमु मेश्राम, साधना धनविजय, जया बनकर, उषा नेवारे, साधना आंबेडारे, रंजना सेरकुरे प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
जिल्ह्यात अभिनव मत्स्यपालन प्रकल्प
By admin | Updated: October 14, 2014 23:14 IST