भंडारा : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका नवजात बाळाला आपले प्राण गमवावे लागले. यातील दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी मृत बाळाच्या दुर्दैवी मातेने केली आहे. शहरातील विद्यानगर भागातील माया वासनिक यांची मुलगी स्मिता प्रमोद बागडे रा. वाराणसी (उ.प्र.) हिला तिच्या प्रसूतीसाठी दि. २१ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता येथील बन्सोड नर्सिंग होमध्ये दाखल करण्यात आले. त्याच दिवशी सकाळी ९ वाजता डॉ. संगीता बन्सोड यांनी सिझेरियनद्वारे प्रसुती केली. डॉ. संगीता बन्सोड व डॉ. संजय बन्सोड यांच्या निदानाप्रमाणे जन्मलेले बाळ सामान्य स्थितीत आणि सुदृढ होते. प्रसूतीदरम्यान व नंतर बालरोग तज्ज्ञ यांची उपस्थिती आवश्यक असताना डॉ. बन्सोड यांनी बाल रोग तज्ज्ञाकडून बाळाची तपासणी करून घेतली नाही. दुसर्या दिवशी दि. २२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता बाळाला ताप आल्याचे लक्षात आले. परंतु, डॉक्टरांनी बाळाची तपासणी केली नाही. डॉ. बन्सोड या बालरोग तज्ज्ञ नसतानाही त्यांनीच औषधे लिहून दिली व औषधोपचार केला. त्यानंतर बाळाची प्रकृती आणखीनच बिघडली व त्याची हालचाल मंदावली. त्यानंतर दि. २३ रोजी बाळाला तडकाफडकी नागपूर येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान दि. ३0 एप्रिल रोजी बाळ दगावला. बाळाच्या उपचारासाठी डॉ. संजय व संगीता बन्सोड हे दोघे जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, सदर प्रकरण शासकीय वैद्यकीय चौकशी समितीकडे सोपविण्यात यावे, बन्सोड नर्सिंग होममध्ये यापूर्वी घडलेल्या बालकांच्या मृत्यूंची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू
By admin | Updated: May 13, 2014 23:19 IST