भंडारा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, वाढीव ऑक्सिजन आणि रमडेसिविर इंजेक्शन तातडीने मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. लवकरच पुरेसा ऑक्सिजन आणि रेमडेसिविर उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, मनुष्यबळ वाढविण्याला प्राधान्य दिले जात आहे.
भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा दररोज उद्रेक होत आहे. हजाराच्यावर रुग्ण आढळून येत आहेत. मृतांची संख्याही वाढत आहे. अशा स्थितीत सर्व रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेत. ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी कदम यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. लवकरच ऑक्सिजन आणि इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. यासोबतच रुग्णांना योग्य उपचारासाठी रुग्णालय व खाटांची संख्या वाढविण्यात येत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सहा डेडिकेटेड कोविड हाॅस्पिटल असून, एक शासकीय आणि पाच खासगी आहेत. २६ डेडिकेटेड कोविड सेंटर असून, त्यात सहा शासकीय व २० खासगी, तर पाच कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. यामध्ये आयसीयू खाटांची संख्या २१९ असून, त्यात ५० शासकीय आणि १६९ खासगी आहेत. ऑक्सिजन खाटांची संख्या ६२० असून, शासकीय २५५ आणि खासगी ३६५, तर व्हेंटिलेटरची संख्या १३० आहे. त्यात ६५ शासकीय व ६५ खासगी व्हेंटिलेटर आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मनुष्यबळ कमी पडत आहे. शासनाच्या निर्देशानुसार कंत्राटी तत्त्वावर वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस १६ पदे, वैद्यकीय अधिकारी आयुष ११ पदे, स्टाफ नर्स ८० पदे तसेच आरोग्य सेवकांची १४२ पदे भरण्यात आली आहेत.
बाॅक्स
लसीकरणात जिल्हा अग्रस्थानी
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरणाला प्रारंभ झाला. आतापर्यंत १ लाख ६१ हजार ५८१ व्यक्तींना प्रथम डोस, तर २६ हजार १४० व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यापैकी प्रथमत: कोविड आजाराशी लढा देणाऱ्या १० हजार १४८ हेल्थकेअर वर्कर यांना प्रथम डोस देण्यात आला आहे. दुसरा डोस ६४८४ हेल्थकेअर वर्करना देण्यात आला आहे. फ्रंटलाईन वर्कर यांना प्रथम डोस ८९७४ आणि दुसरा डोस ४६७२ व्यक्तींना देण्यात आला आहे. ४५ वर्षे वयावरील १ लाख ४२ हजार ४५९ व्यक्तींना प्रथम डोस, तर १४ हजार ९८४ व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे.
बाॅक्स
जिल्ह्यात ५३ हजार डोस शिल्लक
जिल्ह्यात आतापर्यंत कोविशिल्ड लसीचे १ लाख १० हजार ४०० डोस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ८७ हजार ६७४ प्रथम आणि १३ हजार ३२ व्यक्तींना दुसरा डोस असे १ लाख ६८६ व्यक्तींना डोस देण्यात आले आहेत. १९ हजार ८१० कोविशिल्डचे डोस शिल्लक आहेत. तसेच कोव्हॅक्सिनचे १ लाख २४ हजार ९०० डोस प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रथम डोससाठी ७३ हजार ९०७ आणि दुसऱ्या डोससाठी १३ हजार १२८ डोसचा वापर करण्यात आला आहे. ४० हजार १४० डोस शिल्लक आहेत.