जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : क्रीडा परिषदेची बैठक भंडारा : जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा. तसेच तालुकास्तरावर विविध खेळांच्या स्पर्धा घेवून जिल्ह्यातील क्रीडा विकासास चालना द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या. जिल्हा क्रीडा परिषदेच्या कायर्कारी समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस शिक्षणाधिकारी बी.एस. थोरात, भंडारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे, जिल्हा क्रिडा परिषदेचे सदस्य अशोक राजपूत, मधुकांत बांडेबुचे, जिल्हा क्रिडा अधिकारी भाग्यश्री बिले उपस्थित होते. यावेळी जिल्हा क्रीडा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जिल्हात घेण्यात येणाऱ्या क्रिडा स्पर्धा, विभागस्तरीय स्पर्धा तसेच राज्यस्तरीय स्पर्धाची थोडक्यात माहिती जिल्हाधिकारी यांनी घेतली. क्रिडा परिषद व क्रीडा विभागाने संयुक्तीकपणे काम करुन जिल्ह्यातील स्पर्धा यशस्वी कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच क्रिडा परिषदेच्या सदस्यांचा अडचणी जाणून घेतल्या. क्रीडा स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांसोबत खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यावा, तसेच क्रिडा प्रशिक्षणावर जास्तीत जास्त भर दयावा. विविध खेळांच्या संघटनांनी सुध्दा यात सहकार्य करावे व स्पर्धेसाठी येणारा किरकोळ खर्च क्रिडा संघटनेने करावा, असेही ते म्हणाले. क्रीडा स्पर्धेत लागणाऱ्या निधीचा योग उपयोग करुन त्याचे बाबवार खर्च समितीची मान्यता घेवूनच करावा. तसेच समितीचा जमा खर्च पुढील बैठकीत सादर करावा, असे जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी समितीच्या कार्य व २०१६-१७ या सत्रात आयोजित करावयाच्या शासकीय जिल्हास्तर , तालुकास्तर व विभागस्तर विविध क्रिडा स्पर्धाची थोडक्यात माहिती दिली. तसेच २९ आॅगष्ट रोजी स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे प्रकाशित विविध शालेय क्रीडा स्पर्धा क्रिडा लक्ष मार्गदर्शिकेचे विमोचन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. (नगर प्रतिनिधी)
क्रीडा स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा
By admin | Updated: July 31, 2016 00:25 IST