लाखनी : लाखनी तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर कर्यालयाची सुरूवात बंद पडलेल्या इंदिरा गांधी कन्या प्राथमिक शाळेच्या इमारतीत करणात आली. या इमारतीमधून ८ वर्षे तहसील कार्यालयाचा कारभार चालला. त्यानंतर नवीन प्रशासकीय इमारतील मंजुरी मिळाल्यानंतर तिचे काम पुर्णत्वास गेले नाही. नवीन इमारतीचे रितसर उद्घाटन झाले नसतानाही तहसील कार्यालयाचा कारभार तेथून सुरू झाला आहे.नागपूर येथील खडतकर कंस्ट्रक्शन कंपनीला नवीन तहसील कार्यालय इमारतीचे काम देण्यात आले. मार्च २००८ मध्ये इमारतीच्या कामाला प्रारंभ झाला. अद्यापर्यंत इमारतीचे काम पुर्ण झाले नाही. लोकसभा निवडणुका दरम्यान तहसीलदार समर्थ यांनी तहसील कार्यालयातील निवडणूक व पुरवठा विभाग नवीन इमारतीमध्ये हलविले. मागील महिन्यात पुर्णपणे नवीन इमारतीत तहसील कार्यालयाचा कारभार सुरू झाला आहे. नवीन तहसील कार्यालयात पाण्याची सोय नाही. स्वच्छतागृहाला कुलूप लावण्यात आले आहे. यामुळे याठिकाणी येणाऱ्या लोकांना रस्त्यावर लघुशंका करावी लागते.कोट्यावधी रूपये खर्च करून नवीन तहसील कार्यालयाची इमारत तयार करण्यात आली. टाईल्सची घिसाई करण्यात आलेली नाही. नवीन इमारतीत तहसील कार्यालयाचा प्रारंभ होण्यापूर्वी श्रीराम मंगल कार्यालयात तहसील कार्यालयाचा कारभार चालत होता. नवीन प्रशासकीय इमारत जनतेच्या सोयीसाठी परिपूर्ण आहे. परंतु काही सुविधांचा अभाव असल्याने जनतेला त्रास सहन करावा लागतो. तहसील कार्यालयाचे उद्घाटन झाले नाही. कामाच्या फलकावर काम सुरू झाल्याची तारीख लिहिलेली आहे. परंतु काम पूर्ण झाल्याची तारीख लिहिलेली नाही. पावसाळ्यात कार्यालयासमोर पाणी साचते. तहसीलदार समर्थ यांच्यापुढे तहसील कार्यालयातील समस्या दूर करण्याचे आवाहन आहे. (तालुका प्रतिनिधी)
उद्घाटनाविना तहसील कार्यालयात कारभार सुरू
By admin | Updated: August 12, 2014 23:35 IST