माविम कार्यालयातर्फे भंडारा, तुमसर, पवनी शहरांत याबाबत जनजागृती करण्यात येत असून, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यूएनडीपी अंतर्गत मायग्रंट अर्बन सपोर्ट सेंटर एमएससीमार्फत तरुणांना रोजगाराच्या संधी, तसेच विविध शासकीय योजनांची माहिती, कौशल्य प्रशिक्षण, महास्वयंम नोंदणी माविमतर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी माविम जिल्हा कार्यालय मोहाडी येथे अधिक माहितीसाठी गरजूंनी संपर्क साधण्याचे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रदीप काठोळे यांनी केले आहे. प्रारंभी प्राधान्य तत्त्वावर हे केंद्र स्थलांतरितांच्या प्रश्नावर लक्ष देणार असून, याचे अंतिम लक्ष स्थलांतरितांचे आवश्यक मूल्यांकन आणि त्यांचे रोजगाराचे प्रश्न सोडविण्याचे काम करण्यासाठी विविध संधी उपलब्ध करून देणार आहे.
स्थलांतरित झालेल्या गरजू शहरी गरीब लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी, तसेच त्यांच्या प्राथमिक गरजा स्थानिक पातळीवर पूर्ण होण्याइतपत उत्पन्न मिळविण्यासाठी एकच स्रोतावरील अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी करून स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी जनजागृती, तसेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी अंतर्गत कोविडमध्ये काळजी घेणाऱ्या जनजागृतीसाठी मदत करणे अशी विविध प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. ग्रँट सपोर्ट सेंटर अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सेवा स्थलांतरित शहरी गरीब लोकांना कोरोना संक्रमणाची ओळख करून देत जागरूकता मोहीम राबविणे, तसेच वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या नोकऱ्या व व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यासोबतच कोरोना भीतीचा सामना करण्यासाठी जनजागृतीसह रोजगार निर्मिती व त्यासंबंधी शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार स्थानिक शासकीय यंत्रणेचे सहकार्य घेत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या विविध संस्थेबाबत संपर्क साधून स्थलांतरितांना प्रशिक्षण देणे, कौशल्य प्रशिक्षण आणि प्लेसमेंट ऑफर करणाऱ्या कंपनीची नेटवर्किंग युएनडीपी सोबत काम करणाऱ्या विविध संस्थांना मायग्रंट सपोर्ट सेंटरबाबत माहिती देऊन सहकार्य घेत रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे असे मायग्रंट सपोर्ट सेंटर अंतर्गत सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
कोट
कोरोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला आहे. त्यामुळे माविमतर्फे स्थलांतरितांना व गरीब शहरी लोकांना रोजगाराच्या विविध संधी, तसेच शासकीय योजनांची माहिती, त्यांचा प्रचार-प्रसारासोबतच कोरोनाबद्दल जनजागृती करण्यासाठी मायग्रंट सपोर्ट सेंटर अंतर्गत स्थलांतरितांना सुविधा पुरविण्यात येणार आहेत. याचा गरजूंनी लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी, अथवा माविम कार्यालय, मोहाडी येथे संपर्क साधावा.
प्रदीप काठोळे,
जिल्हा समन्वयक,
महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडारा.