साकोली : तालुक्याला बहुमुल्य गौण खनिज संपदा लाभली आहे. यातून शासनाला कोट्यावधीचा महसूल मिळतो. प्रशानाने बोटावर मोजण्या इतक्याच रेतीघाटाचा लिलाव केला आहे. त्यामुळे इतर रेतीघाटातून सर्रास रेतीची चोरी सुरू आहे. परिणामी शासनाला मिळणारा महसूल बुडत आहे.साकोली तालुक्यात चुलबंद नदीसह अनेक लहान-मोठे नाले आहेत. याठिकाणी रेती भरपूर प्रमाणात मिळत असल्याने व दिवसेंदिवस शासकीय कामासह इतर घरगुती बांधकामासाठी रेतीची गरज भासत असल्यामुळे रेती माफियाची नजर या रेतीघाटावर आहे. प्रत्येकवर्षी प्रशासनातर्फे ई-निवेदेच्या माध्यमातून रेतीघाटाचा लिलाव केला जातो. यातून शासनाला कोट्यावधीचा महसूल प्राप्त होतो. लिलाव केवळ बोटावर मोजण्याइतक्याच घाटांचा होतो. लिलाव न झालेल्या घाटातून माफिया सर्रास रेतीची चोरी करतात. ज्या घाटांचा लिलाव करण्यात आला आहे. त्या घाटामधून नियम व अटींना बगल देत अतिरिक्त रेतीचा उपसा सुरू आहे. नियमानुसार रेतीचा उपसा व वाहतूक सुर्याेदय ते सुर्यास्तापर्यंत करणे नियमानुसार बंधनकारक असताना रेतीमाफिया अधिकाऱ्यांशी संगनमत करून रात्रदिवस रेतीचा उपसा करतात व क्षमतेपेक्षा जास्त रेती ट्रॅक्टर व ट्रकमध्ये भरून वाहतूक करतात. परिणामी जड वाहतुक करण्याची क्षमता नसलेल्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते आहेत की नाही हे देखील समजत नाही.क्षमतेपेक्षा जास्त रेतीची वाहतुक करणाऱ्या वाहनावर कार्यवाही करण्याचे अधिकार महसूल, पोलीस व आरटीओना आहेत. मात्र तक्रारी केल्यावरच देखाव्याकरीता कार्यवाही केली जाते. बऱ्याच रेतीघाटावर प्रशासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रेतीचा उपसा केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
साकोलीत रेतीची अवैध उपसा
By admin | Updated: August 22, 2015 00:59 IST