चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात वन विभागाच्या जागेत खणन माफिया विना रॉयल्टीने मुरुमाचे अवैध खोदकाम करीत आहेत. धनेगाव शिवारात मुरुमाचे ढीग तयार करण्यात आले आहे. महसूल व वन विभागाच्या डोळ्यादेखत राजरोस मुरूम खोदकाम सुरू असताना कारवाई करण्यात येत नाही. यात माफियाचे साटेलोटे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे शासकीय जागेत जीवघेणे खड्डेच खड्डे तयार झाले आहे.
अवैध मुरूम खोदकाम कंत्राटदाराच्या अंगलट येणार असून चुल्हाडात दंड वसूल करण्यात येणार आहे.
सिहोरा परिसरात मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत गावात सिमेंट रस्ते तयार करण्यात आले आहे. चुल्हाडात सिमेंट रस्त्याचे कडेला विना रॉयल्टीचे मुरूम घालण्यात आले आहे. गावांचे शेजारी असणाऱ्या तलावातून विना परवानगीने गावातील काही चोरट्यांना हाताशी घेऊन मुरुमाचा विल्हेवाट लावण्यात आले आहे.
हजारो ब्रास मुरूम खोदकाम करण्यात आल्यानंतर महसूल विभाग जागे झाले आहे. अवैध मुरूम खोदकाम केल्या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. शासकीय कामात विना रॉयल्टीचा मुरूम कंत्राटदाराच्या अंगलट आले आहे. लाखो रुपयांची बचत करण्याचा बेकायदा प्रकार कंत्राटदाराने केला आहे. यामुळे मुरुमाचे अवैध खोदकाम केल्या प्रकरणी गुप्ता नामक कंत्राटदाराच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. तलाठी कार्यालयाचे हाकेच्या अंतरावर अवैध मुरूम घालण्यात येत असताना महसूल विभागाच्या यंत्रणा मूग गिळून बसले होते. दरम्यान धनेगाव, सोनेगाव शिवारात खणन माफियांनी महसूल व वन विभागाच्या जागेतच खोदकाम सुरू केले आहे. मुरुमाचे ढीग तयार केले आहे. यंत्रणातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून राजरोस अवैधरित्या मुरुमाचे खोदकाम करण्यात येत आहे. या मुरुमाची विल्हेवाट शासकीय कामात विल्हेवाट लावण्यात येत आहे.
खणन माफियाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या गावाचे शिवारात खणन माफियाचे विरोधात कधी कारवाई झाली नाही. या खणन माफियानी अनेकांच्या शेतशिवाराची नासधूस केली आहे. हरदोली गावात वन विभागाच्या जागेत थेट खोदकाम करण्यात आले आहे. कोट्यवधी रुपयांचा मुरुमाची विक्री करण्यात आली आहे. यात महसूल विभागाच्या तिजोरीत चुना लावण्यात आले आहे. परंतु यंत्रणा गंभीर होताना दिसून येत नाही. मुरली, सोंड्या गावांचे शिवारात अवैध खदान सुरू करण्यात आले आहे. दगड फोडण्याचा बेकायदेशीर कारभार सुरू आहे. वन व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना चिरीमिरी देऊन गिट्टी व मुरुमाचा विक्री करण्यात येत आहे. सिहोरा परिसरात गिट्टी, मुरूम, रेती, विटाचा अवैध व्यवसाय सुरू आहे.