विकास ढोमणे यांचे प्रतिपादन : एमआयईटीमध्ये टेक्नोसन्स २०१६ चे उद्घाटनशहापूर : अभियंताच्या शोधाला शेवट नाही. शोधाच्या अनंत वाटा अभियंत्याद्वारा शोधल्या जातात. जीवनात काही पाहिजे असेल तर काही नवनिर्माणाकडे लक्ष केंद्रित करा. समाजात होणाऱ्या तांत्रिक बदलाचा अभियंता हाच प्रवर्तक व निर्माता असतो. मात्र याकरिता प्रबळ इच्छाशक्तीची आवश्यकता असते. इच्छाशक्ती असेल तर काहीच अशक्य नाही, असे प्रतिपादन डॉ. विकास ढोमणे यांनी केले.स्थानिक मनोहरभाई पटेल इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी येथे आयोजित टेक्नोसंस व आगाज २०१६ च्या उद्घाटन सोहळ्यात अध्यक्षपदावरुन ते बोलत होते. शहापूर एमआयईटी येथे आयोजित टेक्नोसन्स व आगाज २०१६ चा दोन दिवसीय कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज. मु. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे होते. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम, के. पुप्पलवार, प्रकल्प अधिकारी ए. एम. खंडाळकार, एमआयईटीचे प्राचार्य डॉ.प्रल्हाद हरडे व कार्यक्रम समन्वयक प्रो. शाहीद शेख उपस्थित होते. यावेळी डॉ.ढोमणे म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांने आशावादी असले पाहिजे. ध्येय ठरवुन मार्गक्रमण केले तर त्याचा फायदा स्वत:सोबत समाजाला नक्कीच होतो. याकरिता वेळेचे व्यवस्थापन आवश्यक आहे. सोबतच आपले कार्य समाजाभिमुख असावे याचेही भान आवश्यक आहे.टेक्नोसंस या तांत्रिक उत्सवात टाऊन प्लॅनिंग, असेम्बली मानीया, पीपीटी प्रेझेटेंशन, लॉन गॅमींग, बॉक्स क्रिकेट, स्कायवे, टेक्नोहंट, ब्रिज मॉडेलिंग, फेंडस फारेव्हर, अॅग्रीमेळा, पोस्टर व फोटो प्रेझेटेशन, मॉडेल मेकिंग, सी कॉडींग, सर्किट डिझायनिंग चा समावेश करण्यात आला आहे. आगाज या सांस्कृतिक उत्सावात डाँस, नाट्यकृती, फॅशन शो, सिंगिग - व्हॉईस आॅफ एमआयईटी, रांगोळी स्पर्धा, वन मिनिट शो, कार्ड डिझायनिंग, केबीसी, सलाद डेकोरेशनचा समावेश आहे. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण व जीवनातील संधी याविषयी मार्गदर्शन करुन जीवनात येणाऱ्या संधीचे सोन करण्याचे आवाहन केले. याच कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास मंडळ यांच्या सहकार्याने उद्योजकता विकास केंद्राचे उद्घाटन अतिथींच्या हस्ते करण्यात आले. एमआयईटीच्या उभारणीत महत्वाचा वाटा असलेल्या होमकांत तोंडरे व येरपुडे यांचा गौरव करण्यात आला. स्व. चितामणी दामले यांच्या कुटूंबियांना स्मृतीचिन्ह भेट देऊन त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. इंजिनिअरिंगच्या विविध अभ्यासक्रमात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा यावेळी पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. प्रल्हाद हरडे यांनी केले. संस्थेत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. योगेश शेंडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. मोहमंद नासीर यांनी केले. (वार्ताहर)
इच्छाशक्ती असेल तर सर्वच शक्य
By admin | Updated: March 6, 2016 00:25 IST